बोलावं वाटतं खूप पण

बोलावं वाटतं खूप पण... जीभच वळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मन झालंय वादळवारं.. तूफान मनात दाटलंय सारं
आवेगाचा पाऊस जसा... कोसळत जातो धुवाधार
बरसावं वाटतं तसंच पण... शब्दच फळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

स्वतःशीच हसणं होतं... स्वतःशीच बोलणं होतं
कुणी काही म्हटलं तरी... मन मुकं मुकं होतं
ज्यांच्यावाचून नव्हतं करमत.. त्यांच्याशीही जुळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

तुझीच आस, तुझीच ओढ... काहीच नाही वाटत गोड
कानी गुंजते तुझीच शीळ... जीव तुटतो तीळ तीळ
छळायचा जो एकांत आता.. तो ही छळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

मुकी मुकी जरी वाणी... मनी मात्र फुलती गाणी
आटपाट नामे नगरीचा.. तू राजा, मी राणी
सारं तसं खोटं खोटंच... पण मनास वळत नाही
काय झालंय मला...... काहीच कळत नाही !

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा