आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे सातवे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी आज सूत्रे स्वीकारली. जगमोहन दालमिया यांच्यानंतर या महत्त्वाच्या पदी पोहोचलेले ते दुसरे भारतीय आहेत. सिंगापूरमध्ये आज झालेल्या आयसीसीच्या बैठकीत पवार यांनी पदभार स्वीकारला.
मावळते आयसीसी अध्यक्ष डेविड मॉर्गन यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ आज संपला. त्यांच्या जागी शरद पवार यांची नेमणूक करण्याचा निर्णय आयसीसीच्या बैठकीत घेण्यात आला. क्रिकेटसारख्या लोकप्रिय खेळाचे नियमन करणारी आयसीसी ही सर्वोच्च संस्था आहे. यापूर्वी १९९७ साली जगमोहन दालमिया यांनी आयसीसीचे अध्यक्षपद भूषवले होते. त्यांच्यानंतर आता यापदी पोहोचलेले पवार हे दुसरे भारतीय ठरले आहेत.
केंद्रीय कृषिमंत्री असलेले शरद पवार हे बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आहेत. बीसीसीआयचा राजीनामा देऊन गेल्या दोन वर्षांपासून ते आयसीसीचे उपाध्यक्ष म्हणून पदभार सांभाळत होते. आयसीसीच्या परंपरेनुसार उपाध्यक्षांनाच नंतर अध्यक्ष केले जाते. २०११ साली क्रिकेट वर्ल्ड कप भारतीय उपखंडात पार पडणार असून, शरद पवार यांच्या कारकिर्दीतील हा महत्त्वपूर्ण इव्हेंट असणार आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्यानंतर २०१२ साली आयसीसी अध्यक्षपद काबीज करण्याचे ऑस्ट्रेलियाचे माजी पंतप्रधान जॉन हार्वर्ड यांचे स्वप्न धुळीला मिळाले आहे. आशियाई तसेच आफ्रिकन देशांनी हार्वर्ड यांच्या उमेदवारीला विरोध केला. हार्वर्ड यांनी क्रिकेट प्रशासक म्हणून यापूर्वी काम केले नसल्याने त्यांच्या उमेदवारीला पाठिंबा देण्यास आशियाई व आफ्रिकन देशांनी नकार दिला.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा