अजूनही कधी कधी तू येशील असं वाटतं

अजूनही कधी कधी तू येशील असं वाटतं,
तुझ्या कल्पनेनेसुद्धा आभाळ डोळ्यात दाटतं...
नंतर सुरु होतो तो अविरत बरसणारा उनाड पाऊस...
तो पाऊस, त्या जलधारा...
सारं काही तसंच आहे अजूनही...

तोच रस्ता,त्याच वाटा..खुणावतात अजूनही...
पण का कोण जाणे मला हे सारे माझेच शत्रू वाटतात,
स्वतःपासूनही धावले तरी हे बरोबर वाटेत गाठतात...
मला तुला विसरायचंय,

हे यांना मुळी पटतच नाही,म्हणतात,
लाटेचं अन सागराचं नातं कधी तोडूनही तुटत नाही...
खरंच इतकं गहिरं आहे का रे तुझं-माझं नातं?
अजूनही का मन माझं तुझंच गाणं गातं?

तुला जायचंच आहे ना तर खुशाल निघून जा,
जाता जाता माझ्या मनातील आठवणीही घेऊन जा...
ते करशीलही; पण तुझं काय,
हा पाऊस अन या वाटा तुला नाही छळणार?

शांत समुद्रातलं आठवणींचं थैमान त्यांना नाही कळणार?
म्हणूनच अजूनही तू येशील असा विश्वास आहे,
अजूनही या राधेला क्रुष्णभेटीची आस आहे...
ही वाट तुला बोलावतेय एकदा तरी मागे बघ,

खरोखरीच आकाशात भरून आलेत काळे ढग...
पाऊसही आता बघ हळूहळू निवळतोय,
तुझ्यासाठी माझ्यासारखा तोही अधीर होतोय...
हे सगळं आपलं आहे, एकदाच परत ये,

शब्द नको आता फक्त डोळ्यांनाच बोलू दे...
पावसासारखं एकदा त्यांनाही बरसायचंय,
पुन्हा एकदा तुझ्या डोळ्यात स्वतःला विसरायचंय....
नकोस आता इतकं छळू सगळा रुसवा सोडून दे,
कितीदा रे बोलवू, परत ये, परत ये.

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा