卐 मकर संक्रांत 卐

 
सुर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. यामुळे या सणाला 'मकरसंक्रांत' असे म्हणतात. या दिवशी सूर्य पृथ्वीची परिक्रमा करण्याची दिशा बदलवतो. म्हणजेच सूर्य थोडा उत्तरेकडे झुकतो. यामुळे या वेळेला उत्तरायण असेही संबोधतात. सूर्याच्या संक्रमणासोबतच जीवनाचे संक्रमण जोडले आहे. यामुळे या उत्सवाला सांस्कृतिक दृष्टीनेही महत्त्व आहे.

'तमसो मा ज्योतिर्गमय'
'अंधाराकडून प्रकाशाकडे वाटचाल करणे' ही वैदिक ऋषींची शिकवण या दिवशीच प्रयत्नांनी साकार होते. या दिवशीच कर्मयोगी सूर्य अंधकारावर आक्रमण करण्याचा दृढ संकल्प करतो. या दिवसानंतर अंध:कार हळूहळू कमी होत जातो. या दिवसापासून चांगले काम करण्यासाठी शुभ दिवसांची सुरवात होते. म्हणूनच मकर संक्रांतीनंतरच आपला मृत्यू यावा असे अनेक वृद्धांना वाटते. यमराजाला उत्तरायण आरंभ होईपर्यंत थांबवणार्‍या भीष्म पितामह याचे उदाहरण ज्वलंत आहे.

शुक्ल पक्ष अग्नी, ज्योती व प्रकाश याने तर कृष्ण पक्ष अंधकाराने युक्त असतो. या दृष्टीने बघितले तर उत्तरायणामध्ये मृत्यू येणे हे तेजस्वी समजले जाते. काळे व भीतिदायक जीवन मनुष्याला नित्कृष्ट मृत्यूकडे घेऊन जाते.

प्रकाशाचा अंधारावर विजय
मानवी जीवन प्रकाश व अंधाराने भरलेले आहे. त्याच्या जीवनाचे वस्त्र काळ्या व पांढर्‍या तंतूंनी बनलेले आहे. अज्ञान, अंधश्रद्धा, कुसंस्कार ही अंध:काराचे प्रतीके आहेत. अज्ञानाकडून ज्ञानाकडे, अंधश्रद्धेकडून श्रद्धेकडे, कुसंस्काराकडून संस्कारांकडे जाणे हीच मानव जीवनातील संक्रांत ठरेल.

संक्रांत म्हणजे क्रांती
क्रांतीत फक्त परिस्थिती परिवर्तनाची अपेक्षा असते. पण संक्रांतीत परिस्थिती स्थापन करण्याची अभिलाषा असते. यासाठी फक्त संदर्भच नव्हे तर मानवी मनातील संकल्पही बदलायला हवेत. हे काम फक्त क्रांतीनेच शक्य आहे. क्रांतीत हिंसेला महत्त्व असते. पण संक्रांतीत समजूतदारपणाला महत्त्व आहे. अहिंसेचा अर्थ 'प्रेम करणे' असा होतो. संक्रांतीचा अर्थ डोके उडविणे असा नव्हे तर डोक्यातील विचारांना बदलविणे असा होतो.

संक्रांती म्हणजे संगक्रांती
या दिवशी मानवाला काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर या विकारांतून मुक्त होण्याचा प्रयत्न करायला हवा. मुक्त जीवन जगणार्‍या लोकांची संगत धरावी. असेच लोक क्रांतीला योग्य दिशा व मार्ग दाखविण्यासाठी मार्गदर्शन करू शकतात.

संक्रांती म्हणजेच संघक्रांती
कोणतेही मोठे कार्य करण्यासाठी संघाची आवश्यकता असते. 'संघे शक्ती कलौ युगे' संघाने विशिष्ट शक्ती निर्माण होते. या विशाल जगात कोणतेही काम एकटा मनुष्य करू शकत नाही. त्याची शक्ती मर्यादित असते. संघात जास्त प्रमाणात शक्ती असते. ही शक्ती कोणतेही काम सहज शक्य करते.

या सणाच्या निमित्ताने परिचित लोकांकडे जाणे जुनी भांडणे विसरून, नव्याने स्नेहाचे संबंध निर्माण करण्यासाठी ही छान संधी असते.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
 भोगीची भाजी

संक्रांत जवळ आली आहे. संक्रांतीच्या आदला दिवस म्हणजे भोगी. भोगीची भाजी आणि ज्वारीची तीळ लावलेली भाकरी. भोगी आहे येत्या सोमवारी. सुट्टीच्या दिवशी भाज्या आणून भाजीची तयारी करून ठेवा म्हणजे सोमवारी सकाळी पटापट भाजी-भाकरी करता येईल.

थंडीचा कडाका वाढत जातो आणि बाजारात वांग्या-बटाट्याच्या जोडीला हिरवागार घेवडा, हरभऱ्याचे हिरवेगार दाणे, कोनफळ, लालचुटुक गाजरं, भुईमूगाच्या शेंगांची आवक वाढत जाते. मग वांगं-बटाटा-शेवग्याच्या शेंगा आणि सोबत ह्या सर्व भाज्या यांची एकच भेसळभाजी केली की तिची जी रसदार चव तयार होते, तिला तोड नाही. काही भाज्यांची लज्जत ही फक्त ऋतुमानान‌ुसारच वाढते.

सगळ्या भाज्या एकत्र शिजल्यामुळे जी एक मिश्र चव तयार होते, ती अफलातून असते. भोगीच्या दिवशी प्रामुख्याने ब्राह्मणांच्या घरी केल्या जाणाऱ्या भाजीची पद्धत पुढीलप्रमाणे असते- तेल तापलं की त्यात आधी तीळ टाकले जातात. मग राई-हिंग-कढीपत्ता-हळद घालून, तो तडतडल्यावर पावटा-बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा टाकून एक वाफ काढली जाते. आधीच्या या भाज्या शिजल्या की मग मागाहून गाजर-वांगं-मटार टाकून थोडं पाणी टाकून अजून एक वाफ काढली जाते. हे सर्व शिजत आल्यावर भाजलेल्या दाण्यांचा आणि तिळाचा कूट टाकला जातो. तसंच सुकं खोबरं आणि धणे साधारण भाजून त्याचीही पावडर किंवा पेस्ट टाकली जाते. सगळ्यात शेवटी लाल तिखट, गोडा मसाला, आणि चिंचेचा कोळ व गूळ टाकून मस्त शिजवायचं.

भोगीची भाजी करायची अजून एक पद्धत आहे. ही पद्धत कोकणाची आहे. भाज्या सगळ्या वरच्याच असल्या तरी, कोकणात केली जाणारी भोगीची भाजी ही भाजलेल्या कांद्या-खोबऱ्याचं वाटण लावून केली जाते.

अशा या भोगीच्या भाजीबरोबर तांदळाची किंवा ज्वारी-बाजरीची तीळ टाकून केलेली भाकरी मात्र पाहिजे, त्याशिवाय या भाजीची लज्जत नाही.

-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------
मस्त थंडी पडलीय आणि अशा थंडीत स्निग्ध पदार्थ खावेत असे आरोग्यशास्त्र सांगते.
म्हणूनच आपल्या संस्कृतीत या महिन्यामध्ये तीळाचे पदार्थ खावेत असे सांगितले आहे.

नग २५ अंदाजे
साहित्य
पॉलिश पांढरे तीळ : २५० ग्रॅम्स (३/४ कप)
किसलेले चिक्कीचा गूळ : ३०० ग्रॅम्स (३/४ कप)
भाजलेली दलिया किंवा चणा डाळ : ५० ग्रॅम्स (४ टेबलस्पून)
भाजून सोललेले शेंगदाणे : ५० ग्रॅम्स(३ टेबलस्पून)
वेलची पूड : १ टीस्पून
तूप वितळलेलेघी : २ + १ टेबलस्पून

   कृती
१. एक कढई गरम करून त्यात पांढरे तीळ लालसर रंग व खमंग वास येईपर्यत भाजून घ्यावे. बाजूला ठेवावे.
२.एका कढईत एक टेबलस्पून घी गरम करून त्यात गुळ घालून त्याचा पाक होईपर्यत सतत ढवळत राहावे .
३.त्यात टेबलस्पून घी , तीळ , दलिया , शेगंदाणे व वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करावे.
४.एका ताटाला १ टेबलस्पून घी पसरवून त्यात हे मिश्रण ओतून त्याचे लिबांएवढया आकाराचे लाडू बनवावे.
५.हे लाडू हवाबंद भारणीत ठेवावे.

टीप: तीळ व गूळाचे मिश्रण लवकरच घट्ट होते म्हणून गरम असतानाच दुस-याच्या मदतीने लाडू बनवून घ्यावेत.



0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा