गोष्ट 'मराठी एनआरआय मिलेनिअर'ची!

                                      http://www.prahaar.in/thumbnail.php?file=datar_918920116.jpg&size=article_medium
अवघ्या पाव शतकांत दुबईत, मसाल्यांचा राजा बनलेले धनंजय दातार यांचे पुढचे स्वप्न आहे कंपनीचा सुवर्णमहोत्सव स्वत:च्या मालकीच्या विमानात करण्याचे.

आज ते दुबई, अबु धाबी आणि शारजामध्ये दहा सुपरमार्केट्स अल अदिल या कंपनीच्या नावाने चालवत आहे. पंचवीस वर्षांपूर्वी त्यांच्या वडिलांनी सुरू केलेल्या एका छोट्या दुकानाचा हा विस्तार करताना ते स्पाइस किंग बनले आहेत. कारण चितळयांच्या बाकरवडीपासून वऱ्हाडी ठेचा आणि वारणाचं श्रीखंड ते नमकीनपर्यंत पदार्थ त्यांच्याकडे असतात. सर्व प्रकारचे मसाले आणि गव्हाच्या पीठापासून ते भाजणीपर्यंत हेही ते विकतात. या सुपरमार्केटला लागून त्यांची पीठे, भाजणी करण्याची गिरणी त्यांनी टाकली आहे. त्यामुळे ग्राहकाला ताजी भाजणी, नुकतेच दळलेले पीठ मिळते.

सोबतीला मुंज, लग्न, सत्यनारायणाची पुजा यांचे साहित्यही देणारे दातांराचे सुपरमार्केटे तुफान लोकप्रिय झाले आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. केवळ मराठी पदार्थच नव्हे तर पंजाब, राजस्थान, उत्तर भारत अशा अशा अनेक राज्यांतील चवदार पदार्थ तेथे मिळत असल्यामुळे या प्रदेशांत दातार आणि त्यांची कंपनी यांचा भारतीय प्रेमाने उल्लेख करतात.

अर्थात हे यश सहज मिळालेले नाही. अनेकदा सकाळी सहा ते रात्री बारा ते कामात असतात. घरच्या अडचणींचा मग विचार करायला वेळही नसतो. आपण विकतो तो माल दर्जामध्ये सर्वोच्च दर्जाचा असायला हवा या आग्रहामुळे सतत पुरवठादारांशी संपर्क ठेवायचा, मालात कसर राहणार नाही याची काळजी घ्यायची. सतत मुंबई दुबई अशी पायाला भिंगरी लागलेली.

अकोल्यातील करंजेलाड या गावातून निघालेले दातारांचे वडील हे दूरदृष्टीचे होते. ज्या काळात दुबईचा नावलौकिक व्हायचा होता, तेव्हा, म्हणजे १९७५ साली महादेव दातार यांनी दुबईचे भविष्य जाणले. आणि यातच आपला भविष्यकाळ उज्वल आहे हेही त्यांना कळून चुकले. तेथे एका दुकानात नोकरी करताना, आपण एक जण इतरांनी नोकरीला ठेवायचे ही जिद्द बाळगली.

त्यामुळेच त्यांनी पंचवीस वर्षांपूर्वी आपल्या मुलाला बोलावून घेतले. भारतीयांची आणि भारतीय उपखंडातील लोक नशीब अजमावण्यासाठी या वालुकायम प्रदेशात तेव्हा यायला सुरूवात झाली होती. घरापासून दूर असलेल्यांना, घरचे पदार्थ द्यायचे हा निर्णय दातारांनी घेतला आणि बघता बघता त्यांची वार्षिक उलाढाल सव्वादोनशे कोटी रूपयांपर्यंत पोहोचली आहे. यासाठी स्थापलेल्या कंपनीचे नावही त्यांनी अल आदिल म्हणजे भला माणूस असे ठेवले. दातार हे भारतीयांसाठी भला, चांगला माणूस ठरले आहेत.

सध्या जगभरात मंदीची लाट आहे. पण मी मंदीची संधी साधणार असे ते आत्मविश्वासाने सांगतात. माझ्या सहकाऱ्यांचा पगार तर मी कमी करणार नाही, कोणालाही कामावरून काढणार नाही तर नेहमीप्रमाणे त्यांना पगारवाढही दिली आहे असेही ते तितक्याच ठामपणाने सांगतात.

याच बोलण्याया ओघात दुबई आणि मुंबईत व्यवसाय करण्यातील फरकही ते सांगतात. कर आकारणीत सुटसुटीतपणा हे दुबईचे वैशिष्ट्य. विक्रीकर, व्हॅट असे कोणतेही कर तेथे आकारले जात नाहीत. सरसकट पाच टक्के कर भरा आणि मोकळे व्हा असा दुबईच्या सरकारचा सरळ व्यवहार आहे. त्यामुळे करआकारणीची गणिते मांडत बसा, त्यासाठी वेगळे कर्मचारी नेमा असा त्रास नसतो. दुबईच्या बंदरात मालाचा कंटेनर दोन तासांत मोकळा होतो. मुंबईत त्याला वीस दिवसही लागू शकतात असे ते सांगतात.

आज दातार २१० कर्मचारी ठेवून आहेत. यापैकी १६० मराठी आहेत हे सांगताना ते मराठी माणसाने जगभरात नोकरी, व्यवसायात निर्माण होत असलेल्या संधी साधायला हव्यात असा सल्ला देतात. मराठी माणसाकडेही पैसे असतात, पण त्याला त्याचे प्रदर्शन करायला आवडत नाही असे दातार सांगतात.

दातारांच्या बोलण्यात सतत उल्लेख येतो तो पत्नी वंदनाचा. मुळच्या सातारा जिल्ह्यातील खंडोबाची माळ येथील वंदना देशपांडेशी लग्न झाल्यानंतर पहिल्या वर्षातच आपला व्यवसाय चाळीस टक्क्यांनी वाढला हे ते कौतुकाने सांगतात आणि आपल्या कठीण प्रवासात आवश्यकता होती तेव्हा घरची जबाबदारी पार पाडली आणि आता व्यवसायाची आथिर्क बाजू सांभाळत असल्यामुळे आपण इतर बाबींत लक्ष घालू शकतो असे ते सांगतात.

सध्या दातार, पुढल्या पावशतकाचा प्रवास आखत आहेत, पण त्याची रूपरेषा ते सांगत नाहीत. पण यशाचा मंत्र मात्र तोच असेल हे ते स्पष्ट करतात. छोट्यातल्या छोट्या ग्राहकाचा मान राखा, ग्राहक संतापला तरी आपण शांत रहायचे, ग्राहकाला माल कधी मिळेल याची दिलेली वेळ पाळणे आणि मुख्य म्हणजे आलेल्या संपतीची गुर्मी येऊ द्यायची नाही.


सुहास फडके

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा