
बड्या भारतीय कंपन्या विदेशामध्ये विस्तार करताना युरोप-अमेरिकेतील कंपन्या ताब्यात घेत आहेत. या विदेशविस्तारामध्ये लहान व मध्यम आकाराच्या भारतीय कंपन्याही पुढे सरसावत आहेत. एका मराठी उद्योजकानेही 'टेकओव्हर'च्या या आकाशात भरारी घेतली असून 'आयटी'च्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्स क्षेत्रात प्रभुत्व असलेल्या 'ग्लोडाइन' या आनंद सरनाईक यांच्या कंपनीने अमेरिकेतील दोन कंपन्या नुकत्याच ताब्यात घेतल्या आहेत.
इंजिनीअरिंगमधली पदवी आणि जमनालाल बजाज मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटमधून एमबीए केलेल्या सरनाईक यांनी १९९० मध्ये 'एचसीएल-एचपी' या कंपनीतून आपल्या करिअरला सुरुवात केली. आयटी क्षेत्रातील संधींचा आवाका लक्षात आल्यावर त्यांनी १९९७ मध्ये 'ग्लोडाइन'चा पाया रचला. जगभरातील कंपन्या आयटी इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवणूक करतात, ती केल्यानंतर यंत्रणा चालवण्यासाठी आणि तिची देखभाल करण्यासाठी वेगळ्या कंपन्यांची, यंत्रणेची गरज लागेल हे ओळखून 'ग्लोडाइन'ने या क्षेत्रात यशस्वी उडी घेतली. आजच्या घडीला मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, दिल्ली अशा भारतातील बहुतेक प्रमुख शहरातील कंपन्यांना सेवा पुरवताना ग्लोडाइनने विदेशातही शिरकाव केला आहे.
सध्या या कंपनीला ७५ टक्के काम भारतात, तर २५ टक्के काम विदेशातून मिळते. परंतु २०१० मध्ये ७५ टक्के काम विदेशातील असेल, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तयारी करताना 'ग्लोडाइन'ने अमेरिकेतील 'फ्रंट ऑफिस टेक्नॉलॉजीज' ही कंपनी ३३.४० लाख डॉलरना तर 'लिंक ग्रुप इंटरनॅशनल' ही कंपनी ४७.५० लाख डॉलरना ताब्यात घेतली आहे. या अॅक्विझिशन्समुळे अमेरिकन एक्स्प्रेस बँक, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, ऑग्लिव्ही अँड मॅथर वर्ल्डवाइड, बार्टल बॉगल हेगार्टी, सॉथबीज, अल्केमी अशा अनेक ग्राहकांची भर पडली असून, अमेरिकेमध्ये वाढीला चालना मिळाली आहे. वेगवान वाढ साधण्यासाठी आणखी विस्तार करण्यात येत असून, विलिनीकरणासंदर्भात काही कंपन्यांशी बोलणी सुरू आहेत, असे सरनाईकांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.
सध्या ऑपरेशन अँड मेन्टेनन्स क्षेत्राचे मार्केट सुमारे ५४० अब्ज डॉलरचे असून, या क्षेत्रातील सुमारे ५५ टक्के हिस्सा काबीज करण्याची भारताची क्षमता असल्याचे सरनाईक म्हणाले. 'ग्लोडाइन'ची उलाढाल ३०० कोटी रुपयांची असून, कंपनीमध्ये ६४० कर्मचारी आहेत. २०१० पर्यंत कर्मचारीसंख्या अडीच हजारांपर्यंत वाढवण्याचे टार्गेट आहे.
योगेश मेहेंदळे, मुंबई
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा