बाप

शाळेपासून बापाच्या तो धाकात रहात असतो
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक लपवत असतो
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो
डोळे चुकवून बापाचा हुंदडायला जात असतो

शाळा संपते, पाटी फुटते, नव जग समोर येतं
कॉलेज नांवाच्या भुलभुलैयात मन हरखून जात असतं
हाती आलेले मार्क घेऊन पायऱ्या झिजत फिरत असतं
बाप पहातो स्वप्न नवी, हे मुखडा शोधत असतं

सुरु होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात
एटीकेटी च्या चक्रातून वर्ष पुढे सरत जातात
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात
माझा बाप ठाउक नाही म्हणत धमक्या गाजत असतात

परीक्षा संपते, अभ्यास सरतो डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवतो, ती टिकवत कमावू लागतो चार दिडक्या
आरामात पसरणारे बाजीराव मग घोड्यावर स्वार होतात
नोकरीच्या बाजारात मग नेमाने मोहिमा काढू लागतात

नोकरी बदलते, छोकरी सापडते बार मग उडतो जोरात
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करु लागतात
दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं
नव्या कोऱ्या बापाला मग मात्र जुन्याचं मन कळू लागतं

नवा कोरा बाप मग पोरा सवे खेळू लागतो
जुना बाप आता आजोबाच्या कायेत शिरतो
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळांत
एकाला दिसतो दुसरा लहान दुसरा पहातो गोष्ट महान

रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक
बापाच्या भूमिकेतून पोर पहातो भूतकाळ
लेकरासाठी कळवळणारा मग बाप दिसतो
त्याची लाल रेघ ऊरात घेऊन जो फिरत असतो

कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं
दोन घास कमी खाईल पण पोराना गोड देतो
हट्टासाठी पोरांच्या तो ओव्हरटाईम करत असतो

डोक्यावरती उन झेलीत सांवली तो देत असतो
दणदणत्या पावसातून कुटुंब आपले जपत असतो
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो
आईच्या मऊशार तळव्या मागचा तोच राकट आधार असतो

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही
बाप कधी उतत नाही, बाप कधी मातत नाही
पोरं सोडतात घरटं अन् शोधतात क्षितिजे नवी
बाप मात्र धरुन बसतो घरट्याची प्रत्येक काडी

पोरांच्या यशा सोबत त्याच मन हसत असतं
अपयश पचवताना आतून ते रडत असतं
कांही झालं कितीही झालं तरी कणा ताठ असतो
खचलेल्या पोराला तोच उभारी देत असतो

सारी कथा समजायला फार मोठं व्हाव लागतं
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं
आकाशाहून भव्य व सागराहून खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय
बाप माणूस असतो कसा कळणार नाही झाल्याशिवाय
असतं न्यारंच रसायन त्याची फोड उकलत नाही
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही

करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही
चार ओळीत सांगण्यासारखा बाप कांही छोटा नाही
सोन चाफ्याचे फुल ते सुगंध कुपित मावणार नाही
बाप नांवाच्या देवाचा थांग कांही लागणार नाही

केला खरा आज गुन्हा त्याला छोडा शोधण्याचा
जमेल तेवढा सांगीतला आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं त्याच्या शिवाय जमत नाही
आई मार्फत बोललं तरी बोलल्याशिवाय रहावत नाही

सांगतो आता शेवटचं, कान करा ईकडे जरा
पृथ्वि तोलून धरण्यासाठी शेषाचाच लागतो फणा
बाप नांवाच्या वृक्षाचं असंच कांहीस जिणं असतं
ते समजून घेण्या साठी बाप होणं भाग असतं

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा