सकाळी थोडा पाऊस उघडतो
आपल्या खोलिचं दार उघडून
आपण दोघे बाहेर पडतो
तुझा चेहेरा फुल्लेला
माझा चेहेरा अजूनही
तुझ्यामधेच भुल्लेला
तू भिजलं फूल दिसतेस
पावसात उठली हूल दिसतेस
कुठेही घेऊन चल असं
कडेवरलं मूल दिसते
वेटर सगळे आपल्याकडेच
पाहात करतात गिल्ला
कुणीतरी खवचट ओरडतो
' कौए के हाँथ रसगुल्ला '
तू तात्काळ तशीच थांबतेस
झट्कन् मागे वळून बघतेस
माझा हात घट्ट धरून
पुन्हा तडक रूम गाठतेस
बाहेर पाऊस मुसळधार
आता वाढत असतो
तितक्यात हळूच एक कावळा
खिडकित येऊन बसतो
पंख चिंब भिजलेले
डोळे मिट्ट मिटलेले
कावळ्याकडे पाहून
तू माझ्याकडे बघतेस
पावसात चिंब भिजलेली
एक चिमणी दिसतेस
अशासाठी कधीतरी
दुसऱ्या दिवशी सकाळी
चिमणी होऊन जिव्हाळी
समजून घ्यायला येशिल का ?
कुठल्यातरी एका पावसाळी दुपारी
सहज सोपं बोलत बोलत
तुडुंब गर्दीत माझ्या सोबत
अनोळखी शहरात
भिजत चिंब दुस-या प्रहरात
चालत जायला येशील का ?
- सौमित्र
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा