अशाच पावसाळी

अशाच  पावसाळी
कुठल्या एका संध्याकाळी

समुदकिनारी
ढगांमागे कुठेतरी

सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असतांना
समुदाची गाज दोघांवरून पार होतांना
माझं झालं गेलं मला उगाच आठवत राहातांना
गालावरून माझे अश्रू पावसात मिसळून वाहातांना

नकळत तू माझा हात हातात घेतल्यावर
हळूच तुझ्याकडे मी मान वळवुन पाहिल्यावर
तुझ्या गालांवरला पाऊस आणि तुझे अश्रू
मला चक्क वेगवेगळे निथळतांना दिसल्यावर

अश्रू पुसायला मी तुझ्या गालांशी हात न्यावा
पण माझ्या बोटांत फक्त पाऊसच येत रहावा

आणि तू खळखळून हसत
माझ्याही नकळत
माझ्या मिठीत शिरावी

आपण दोघे घट्ट बिलगत
गाजेमधून विरत विरत

किनाऱ्यावर फक्त हुरहूर उरावी

अशासाठी पावसाळी
कुठल्यातरी संध्याकाळी

उधाण भरतं आल्यावर
हुरहूर होऊन समुदावर
पसरत जायला येशिल का ?

दाट काळोख होशिल का ?
माझ्या सोबत तुझा चेहेरा
काळोखाला देशिल का ?

                    -  सौमित्र

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा