कळते मला खरे म्हणजे
शेवटी कोणी कोणाचे नसते
आणि मानले तर कोणी
अगदी तन मन व्यापून उरते....
विजेच्या तारेवरून
पावसाच्या थेंबांची माळ उतरावी
डोळ्यांच्या कडांवरून
अश्रूंची सर ओघळावी...
इतके साधे सहज
दु :ख निरपून जाते कधी?
हृदयावरचे चटके असे
सोसून निर्ढावते का मन ....
कुंपणासाठी लावलेली मेंदी
हवीहवीशी पण बाहेरच ठेवलेली
तसे "मी" भोवती धरावे
आठवणींनी रिंगण .....
खरच का हवे आहेत
असे तनामनाचे गुंते मला
की बरेआहे आपले
मेंदीच्या कुंपणासारखे सगळे सीमारेषेवर...
भूतकाळाची काजळी
कधीतरी स्वच्छा करायला हवी
सूर्यकिरणांना निदान
उंबरठ्यावर येऊ द्यावे, नाही का !
-माधुरी
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा