श्री मोरेश्वर
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील मोरगांव हे अष्टविनायकात गणेशोपासनेच्या संप्रदायाचे प्रमुख आद्यपीठ मानले जाते. या क्षेत्राचे मुळनांव "भुस्वानंदभुवन" असे होते. गावात पुर्वी खुप मोर होते म्हणुन याला मोरग्राम किंवा मोरगांव असे नांव पडले आहे.
हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते आणि येथे व्यक्त केलेली ईच्छा पुर्ण होते अशी सार्वत्रिक भावना आहे. हे गणेश स्थान प्रसिध्द झाले ते महान गणेश भक्त "मोरया गोसावी" हयांच्याशी संबधीत असल्या कारणानेच....
श्रेष्ठ गणेश भक्त मोरया गोसावी यांचे हे जन्मस्थान. मोरया गोसावी हे मोरेश्वराचे अनन्य भक्त होते. येथिल "ब्रम्हकमंडल"तीर्थात त्यानां एक गणेश मुर्ती सापडली या मुर्तीची त्यांनी चिंचवडला स्थापना केली. व तेथे भव्य मंदिर बांधले. मोरया गांसावी दर शुध्द चतुर्थीला मोरगांवला यात्रेला जात असत. आजही माघी शुध्द चतुर्थी व भाद्रपद शुध्द चतुर्थी या दिवशी चिंचवडहून मोरगांवला गणेश देवांची पालखी जाते.
या मुर्ती संबधी एक आख्यायिका अशीही सांगीतली जाते की, सद्या जी मुर्ती आहे ती मुळ मुर्ती नसून मुळ मुर्ती मृत्तिका, लोह व रत्न याच्या अणुपासून बनविलेली असून ती सद्याच्या मुर्तीच्या मागे अदृष्य आहे. तीची स्थापना ब्रम्हदेवाने केली होती सिंधुसुराने तीचा विध्वसं केला त्यानतर ब्रम्हदेवाने दोन वेळा या मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केली. पुढे काही काळानंतर पांडव तीर्थयात्रेनिमीत्त येथे आले असता मुळ मुर्तीला कोणी धक्का लावू नये म्हणून तीला तांब्याच्या पत्र्याने बंदिस्त केले.
श्रींची मुर्ती चतुर्भुज व त्रिनेत्र असून वरच्या दोन हातात पाश व अंकुश धारण केले आहे. खालच्या दोन हातापैकी एक उजव्या गुडघ्यावर ठेवलेला असून डाव्या हातात मोदक धारण केलेला आहे. असे श्रींच्या मुर्तीचे वर्णन मुद्गल पुराणत केले गेलेले आहे.
भाद्रपद शुध्द चतुर्थी वमाघ शुध्द चतुर्थी (गणेश जयंती) असे दोन उत्सव मोठयाप्रमाणात साजरे केले
या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.
जवळच कर्हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा