श्री चिंतामणी
महाराष्ट्रात पुणे जिल्हयातील हवेली तालुक्यात अष्टविनायकातील महत्वाचे स्थान मानले जाते. हे क्षेत्र अति प्राचीन व जागृत देवस्थान समजले जाते. यास्थानाची पुराणात अशी आख्यायिका सांगीतली जाते की,
एकदा ब्रम्हदेवाच्या मनात चंचलता निर्माण झाली. आपल्या मनातील चंचलता कमी व्हावी यासाठी ब्रम्हदेवाने श्रीगणेशाची चिंतन व आराधना केली. त्यामुळे ब्रम्हदेवाच्या मनातील चंचलता नाहीशी झाली. व ब्रम्हदेवाच्या मनाला शांतता लाभली. त्याठिकाणी ब्रम्हदेवाने श्री गणेशाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना केली. त्यागणेश मुर्तीला मनाची चिंता दुर करणारा "चिंतामणी" असे नांव दिले.
आणखी एक कथा अशी सांगीतली जाते की, अहल्येचा अपहार केल्याबद्दल इंद्रला शाप दिला. इंद्र भयभीत झाला व त्याने गौतम ऋषींची क्षमा मागीतली व उ:शाप देण्याची विनंती केली. व गौतम ऋषींच्या आज्ञेने इंद्राने तपश्चर्या केल्यामुळे तो शाप मुक्त झाला. ज्याठिकाणी बसून इंद्राने तपश्चर्या केली त्यास्थानावर इंद्राने गणेशाची स्थापना केली व त्या गणेश मुर्तीस 'चिंतामणी' असे नांव दिले. अशा अनेक कथा पुराणात लिहिल्या गेल्या आहेत.
येथे अनुष्ठान करणार्या व्यक्तीला मन:शांती व मनाला स्थिरता प्राप्त होते.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला श्री चिंतामणींचा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा होतो.
थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.
पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.
थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा