श्री बल्लाळेश्वर
रायगड जिल्हयातील सुधागड तालुक्यात अष्टविनायकातील पाली चा "श्री बल्लाळेश्वर " हे स्थान अत्यंत प्रसिध्द व जागृत स्थान आहे.फार पुर्वी सिंध नावाच्या देशात पाली नावाचे एक गांव होते त्यागावात कल्याण नावाचा एक व्यापारी राहात होता. त्याला बल्लाळ नावाचा एक मुलगा होता तो आपल्या मित्रासोबत गावाबाहेर खेळत असे. दगडाचे देव करायचे. फुले पाने तोडून त्या देवांची पुजा करायची असे ते खेळत असे. एक दिवस बल्लाळ आपल्या मित्रांसोबत जंगलात खेळायला गेला होता त्याला तेथे एक छानसा गुळगुळीत दगड सापडला त्याने त्या दगडाला गणपती असे नाव दिले . व त्याची पुजा करु लागला. बराच वेळ हा खेळ असाच चालु राहिला त्यामुळे ती मुले घरी परतली नाही. गावातल्या लोकांनी बराच वेळ शोध घेतल्यावर ती मुले बल्लाळ सोबत जंगलात आढळली. तेव्हा गावकर्यांनी चिडून त्याच्या वडीलांकडे बल्लाळाची तक्रार केली त्यावर कल्याण रागानेच जंगलाकडे गेला. जंगलातले दृष्य पाहून कल्याण जास्तच संतापला कारण सर्व मुले गणपतीच्या खेळातदेवासमोर नाचत होती व बल्लाळ ध्यान लावून बसला होता. मुलांनी तयार केले ले मंदिर त्याने उध्वस्त केले. ते पाहताच मुलांनी तेथुन पळ काढला. पण बल्लाळ मात्र ध्यानात गढुन गेला होता. ते पाहून कल्याणने तेथिल झाडाची फांदी घेवून बल्लाळच्या अंगावर चार पाच घाव केले. ऐवढे करुनही त्याचे ध्यान तुटले नाही. ते पाहून कल्याण अधिक चिडला व त्याने बल्लाळाला झाडाला बांधले. पण बल्लाळ मात्र गणेशाचा जप करत होता. बल्लाळाला बांधून कल्याण घरी निघून गेला तरी त्याचा जप चालुच होता. थोडयावेळाने त्याचे डोळे उघडले. तेव्हा त्याला दिसले गणपतीचे मंदिर मोडले आहे. तो म्हणाला ज्याने तुझी अवस्था केली आहे तो आंधळा, मुका व बहिरा होईल. त्याच्या शरीरातुन दुर्गंधी बाहेर पडेल. ते बोलुन पुन्हा तो श्री गणेशाची पुजा करायला लागला. त्याच्या भक्तीला प्रसन्न होवून गणेशाने बल्लाळला भेटण्याचे ठरविले. एका गरीब ब्राम्हणाचे रुप घेवून श्री गणेश त्या जंगलाकडे निघाले. बल्लाळाला ज्या झाडाला बांधले होते त्या झाडाजवळ गेले व त्याने बल्लाळाकडे पहाताच त्याचे बंधन सुटले व त्याच्या जखमा चांगल्या झाल्या. तेव्हा श्री गणेश म्हणाले तुला काही मागायचे असेल तर मागुन घे. हे एकुण बल्लाळ म्हणाला मला वर देणा असेल तर ऐवढाच द्या की आपल्या ठिकाणी भक्ती कायम राहावी. व आपण या क्षेत्री कायम रहिवास करुन भक्ताची सर्व संकटे दुर करवीत तेव्हा गणेश म्हणाले तु फार चांगला वर मागीतलास तर तुझ्या मांगण्याप्रमाणे मी वास करेल. शिवाय या ठिकाणी माझे स्थान बल्लाळविनायक म्हणून प्रसिध्द होईल.
भाद्रपद शुध्द चतुर्थीला येथे प्रमुख उत्सव होतो.
या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.
हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.
पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो. भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.
अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा