स्वाभिमान, पराक्रम आणि ध्येयनिष्ठेच्या जोरावर मराठी माणसाचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलं गेलं. या इतिहासाच्या पाऊलखुणा सांगणारे किल्ले आजही महाराष्ट्रात मोठ्या दिमाखात उभे आहेत. मराठ्यांच्या यशाचे आणि पराक्रमाचे साक्षीदार असलेल्या या किल्ल्यांवर मराठीत मोठ्या प्रमाणात लिखाण झालंय. हा गौरवशाली इतिहास भावी पिढीलाही कळावा आणि किल्ल्यांची कीर्ती परदेशी पर्यटकांपर्यंत पोहचावी, यासाठी प्रवीण भोसले या इतिहास संशोधकाने किल्ल्यांवर इंग्रजीत पुस्तकं लिहिली आहेत.
सांगलीच्या प्रवीण भोसले यांनी १७ वर्षांत मोटारसायकलवरून दोन लाख किलोमीटर प्रवास करत मराठ्यांच्या कतृर्त्वाचे साक्षीदार असलेल्या २०० किल्ल्यांची भ्रमंती केलीय. प्रत्येक किल्ल्याचे बारकावे आणि वैशिष्ट्यं दाखवणारे ३८ हजार फोटो त्यांच्या संग्रही आहेत. त्यापैकी १६०० फोटोंचं भव्य प्रदर्शन भोसले यांनी ३८ ठिकाणी भरवलं आहे. अनेक दिग्गज इतिहासतज्ज्ञांनी त्यांच्या या कामाचा गौरव केला आहे. युद्घात धारातिथीर् पडलेल्या १२५ योद्ध्यांच्या समाधीस्थळांची सखोल माहिती देणारं 'मराठ्यांची धारातिथेर्' हे पुस्तक भोसले त्यांनी लिहिलंय. दूरवस्थेतल्या या समाधीस्थळांच्या जीणोर्द्धाराचं कामही भोसले आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हाती घेतलं आहे.
गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास मराठी भाषिकांच्या कक्षा ओलांडून साता समुदापार जावा, यासाठी किल्ल्यांची पुस्तकं इंग्रजीत लिहिण्याचा ध्यास भोसले यांनी घेतला. त्यातूनच आता रायगड, प्रतापगड, सिंधुदुर्ग, पन्हाळा, विशालगड, राजगड, तोरणा, सिंहगड, पुरंदर, विजयदुर्ग, कुलाबा, देवगिरी, जंजिरा आणि शिवनेरी अशा १४ किल्ल्यांची माहिती इंग्रजीत उपलब्ध झाली आहे.
किल्ल्यांवर इंग्रजीत अत्यंत त्रोटक लिखाण आणि काही ठिकाणी फक्त फोटो उपलब्ध आहेत. हॉटेल आणि लॉजच्या जाहिरात करण्यासाठी टुुरिस्ट गाइडमधेे किल्ल्यांची माहिती घुसडण्याचा प्रकार आपल्याकडे चालतो. परंतु, मी लिहिलेली पुस्तकं या साऱ्यापासून चार हात लांब असल्याचं भोसले अभिमानाने सांगतात. या पुस्तकांमधेे किल्ल्यांचं लोकेशन, तिथे जायचं कसं, राहायची व्यवस्था कुठे आहे, किल्ल्यांवर काय पहायचं, त्यांचं ऐतिहासिक महत्त्व काय आहे याबाबतची सखोल माहिती दिलेली आहे. विशेष म्हणजे प्रत्येक पुस्तकांत किल्ल्यांवरची अनेक छायाचित्रं आहेत. त्यामुळे पुस्तक हातात पडल्यानंतर या किल्ल्यांना भेट देण्याचा मोह होतोच.
नवी पिढी इंग्रजीतून शिक्षण घेत आहेत. मराठीतली किल्ल्यांवरची पुस्तकं या मुलांकडून वाचली जातील ही अपेक्षा ठेवणं चुकीची आहे. त्यामुळे सोप्या इंग्रजीतून ही पुस्तकं लिहिल्याचं भोसले यांनी सांगितलं. तसंच काही वर्षांत किल्ल्यांकडे देशी आणि परदेशी पर्यटकांचा ओढा वाढतोय. प्रतापगडावर वर्षभरात आठ लाख पर्यटक आले होते. अजंठा आणि वेरुळच्या लेण्यांमुळे देवगिरी किल्ल्यावर तसंच डेक्कन ओडिसीमुळेही सिंधुदुर्ग आणि पन्हाळ्यावर अनेक परदेशी पर्यटक दाखल होऊ लागले आहेत. त्यांना किल्ल्यांबाबतची माहिती इंग्रजीत दिली तर त्यांची आवड वाढून किल्ल्यांवर येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. त्यामुळे हे किल्ले परदेशी टुरिस्टच्या मॅपवर येतील, अशी आशा भोसले यांना वाटतेय.
- संदीप शिंदे, ठाणे
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा