अशाच पावसात अर्धा भिजत
मी तुला सांभाळत सांभाळत
नेत असतो एखाद्या
अनोळखी शहरातल्या रस्त्यावरून
तू सावध चालत असतेस
थोडी जवळ थोडी दुरून
आणि अचानक
तू माझ्या हातातली छत्री घेतेस
मिटून टाकतेस टाकूनच देतेस
आणि माझा हात हातात घेऊन
रस्त्यात साठल्या पाण्यातून
तू पाणी उडवत चालू लागतेस
कडेकडेने उभे असलेले लोक
माझा प्रचंड हेवा करत पाहात असतात
आणि मी मात्र
तू छत्री मिटलीस
टाकून दिलीस
अशा पावसात माझ्यासोबत
चक्क चिंब भिजत चाललीस म्हणून
रस्त्यात साठल्या डबक्यावरून
एखाद्या सूफी संतासारखा
न बुडता चालत जातो
हरखून तुझ्याशीच बोलत राहातो
माझ्यासोबत अनोळखी शहरात
भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात
चालत जायला येशिल का ?
- सौमित्र
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा