गुणांचे बारा कॉलम


लग्न जमविताना अपुऱ्या ज्ञानावर पत्रिका पाहून गुण तपासू नयेत. राशींच्या नियमांनुसार मित्र रास, शत्रू रास ठरलेल्या असतात. शत्रू राशीचा साथीदार निवडला, तर लग्न यशस्वी होईलच, असे नाही. केवळ रासच नाही, तर व्यक्‍तिमत्त्व, करिअर .यांसारख्या इतर गोष्टी पाहणेही गरजेचे असते.

विवाह करताना पत्रिका बघितली जाते; त्यावेळी वधू-वरांच्या पत्रिका पाहून घरातील बुजुर्ग जुजबी ज्ञानावरून आणि पंचांगाच्या आधाराने साधारण गुणमिलनाचा अंदाज घेतात व ज्योतिषाकडे जाण्याचा वेळ, खर्च वाचवतात. सोप्या भाषेत सांगायचे, तर गुणमिलन म्हणजे वधू-वराची रास एकमेकांशी जमते, का पाहणे. पंचांगात गुणमीलनाच्या तक्‍त्यात आडव्या रकान्यात वधूची रास, तर उभ्या रकान्यात वराची रास दिलेली असते. हे कॉलम ज्या ठिकाणी एकत्र जुळतात तेथे गुण दिलेले असतात. जास्तीत जास्त 36, तर कमीत कमी 18 गुण जमणे आवश्‍यक असते. अशा पद्धतीने गुण पाहणे, कुणालाही जमू शकेल; पण केवळ अशा पद्धतीने निर्णय घेतले, तर त्यात अनेक त्रुटी राहतात.

गुणमीलन करताना दोघांच्या पत्रिकेतील चंद्राचा (राशीचा) विचार केला जातो. चंद्र हा मनाचा कारक आहे. त्यावरून माणसाच्या मनाची जडणघडण, मानसिकता, भावना यांचा बोध होतो. इतर अकरा ग्रहांची स्थिती, परिणाम, ग्रहयोग व लग्नरास यांचा विचार केला जात नाही. गुणमिलन करताना इतर ग्रहांची साथ लाभत आहे, की नाही हे पाहणे अधिक गरजेचे असते. व्यक्तिमत्त्व, शारीरिक क्षमता, प्रगतीचा वेग व उद्दिष्ट, करिअर अशा गोष्टींचाही विचार करणे आवश्‍यक असते.

लग्नराशी

मेष : ही अग्नितत्त्वाची रास आहे. या राशीत जोम, उत्साह, महत्त्वाकांक्षा व शारीरिक क्षमता अधिक असते.
मित्र राशी: सिंह, धनू
शत्रू राशी: कन्या, वृश्‍चिक, मीन
नैसर्गिक भागीदार: तूळ
आकर्षण: मकर
स्थितप्रज्ञ: वृषभ, मिथुन, कर्क, कुंभ

वृषभ: ही अर्थतत्त्वाची रास आहे. पैशाच्या व्यवहाराला ही रास प्राधान्य देते. कला, सौंदर्याचा दृष्टिकोन अधिक असतो.
मित्र राशी: कन्या, मकर
शत्रू राशी: तूळ, धनू, मेष
नैसर्गिक भागीदार: वृश्‍चिक
आकर्षण: कुंभ
स्थितप्रज्ञ: मिथुन, कर्क, सिंह, मीन

मिथुन: बौद्धिक तत्त्वाची रास. या राशीचे लोक सतत नाविन्याच्या शोधात असतात. बौद्धिक दर्जाचा विचार प्राधान्याने करतात.
मित्र राशी: तूळ, कुंभ
शत्रू राशी: वृश्‍चिक, मकर, वृषभ
नैसर्गिक भागीदार: धनू
आकर्षण: मीन
स्थितप्रज्ञ: मेष, कर्क, सिंह, कन्या.

कर्क: ही जलतत्त्वाची रास आहे. या व्यक्ती भावनाशील असतात. सभोवतालच्या व्यक्तींविषयी प्रेम, जिव्हाळा दाखवितात.
मित्र राशी: वृश्‍चिक, मीन
शत्रू राशी: धनू, कुंभ, मिथुन
नैसर्गिक भागीदार: मकर
आकर्षण: मेष
स्थितप्रज्ञ: वृषभ, सिंह, कन्या, तूळ

सिंह: अग्नितत्त्वाची रास. कार्यतत्परता, नेतृत्वगुण यांना या व्यक्ती प्राधान्य देतात.
मित्र राशी: मेष, धनू
शत्रू राशी: मकर, मीन, कर्क
नैसर्गिक भागीदार: कुंभ
आकर्षण: वृषभ
स्थितप्रज्ञ: मिथुन, कन्या, तूळ, वृश्‍चिक

कन्या: अर्थतत्त्वाची रास. या राशीच्या व्यक्ती कुठलाही निर्णय घेताना पैशाचा विचार करण्याला प्राधान्य देतात.
मित्र राशी: मकर, वृषभ
शत्रू राशी: कुंभ, मेष, सिंह
नैसर्गिक भागीदार: मीन
आकर्षण: मिथुन
स्थितप्रज्ञ: कर्क, तूळ वृश्‍चिक, धनू

तूळ: बौद्धिक तत्त्वाची रास. विविध विषयांचे ज्ञान संपादन करण्याची वृत्ती असते.
मित्र राशी: मिथुन, कुंभ
शत्रू राशी: मीन, वृषभ, कन्या
नैसर्गिक भागीदार: मेष
आकर्षण: कर्क
स्थितप्रज्ञ: सिंह, वृश्‍चिक, धनू, मकर

वृश्‍चिक: जलतत्त्वाची रास, त्यामुळे गतिमानता हा गुण आहे. त्यांची स्वतःची विचार करण्याची व वागण्याची पद्धत वेगळी असते.
मित्र राशी: मीन, कर्क
शत्रू राशी: मेष, तूळ, मिथुन
नैसर्गिक भागीदार: वृषभ
आकर्षण: सिंह
स्थितप्रज्ञ: कन्या, धनू, मकर, कुंभ

धनू: अग्नितत्त्वाची रास. या राशींच्या व्यक्तींमध्ये जीवनशक्ती भरपूर असते.
मित्र राशी: मेष, सिंह
शत्रू राशी: वृषभ, कर्क, वृश्‍चिक
नैसर्गिक भागीदार: मिथुन
आकर्षण: कन्या
स्थितप्रज्ञ: तूळ, मकर, कुंभ, मीन

मकर: अर्थतत्त्वाची रास. कुठलाही निर्णय घेताना सखोल विचार करून काय फायदा होईल, याचा विचार आधी करतात.
मित्र राशी: वृषभ, कन्या
शत्रू राशी: सिंह, धनू, मिथुन
नैसर्गिक भागीदार: कर्क
आकर्षण: तूळ
स्थितप्रज्ञ: मेष, वृश्‍चिक, कुंभ, मीन

कुंभ: बौद्धिक तत्त्वाची रास. एकमेकांचे विचार समजून घेण्याची पात्रता असते. शारीरिक आकर्षण अत्यंत कमी असते.
मित्र राशी: मिथुन, तूळ
शत्रू राशी: कर्क, कन्या, मकर
नैसर्गिक भागीदार: सिंह
आकर्षण: वृश्‍चिक
स्थितप्रज्ञ: मेष, वृषभ, मीन, धनू

मीन: जलतत्त्वाची रास, त्यामुळे भावनाप्रधानता आहे.
मित्र राशी: कर्क, वृश्‍चिक
शत्रू राशी: सिंह, तूळ, कुंभ
नैसर्गिक भागीदार: कन्या
आकर्षण: धनू
स्थितप्रज्ञ: मेष, वृषभ, मकर, मिथुन

थोडक्‍यात सांगायचे, तर गुणमीलन बघताना मनोमीलन होते का, याचा विचार केला जावा. दोन्ही पत्रिकांचा व्यवस्थित अभ्यास करावा; म्हणजे संसार आनंदाचा व दीर्घकाळासाठी टिकणारा होऊ शकेल.

साथीदाराला आनंदी कसे ठेवावे

लग्नाच्या किंवा धंद्याच्या भागीदारीतील सुख, यासाठी नशीब लागते, असे अंशतः मान्य केले, तर साथीदाराला सुखी व आनंदी ठेवण्यासाठी ज्योतिषशास्त्रात काही नियम दिले आहेत. या नियमांप्रमाणे वैयक्तिक जीवनात किंवा धंद्यात साथीदाराची निवड केल्यास दोघांनाही आनंद लुटता येईल व भरभराट करून घेता येईल. ज्योतिषशास्त्रात राशींचे चार गट केले आहेत.

1. मेष, सिंह, धनू
2. वृषभ, कन्या, मकर
3. मिथुन, तूळ, कुंभ
4. कर्क, वृश्‍चिक, मीन

या राशींची लग्ने या चार त्रिकोणांतील असल्यास दोघे आनंदी व सुखी राहू शकतील, असे ढोबळमानाने समजल्यास हरकत नाही. याबरोबरच महत्त्वाचा नियम म्हणजे सप्तम स्थानात अशुभ ग्रह उपयोगी नाही; विशेषतः वक्री ग्रह नसावेत. तसे असेल, तर फसवणूक होण्याची शक्‍यता असते, किंवा निवड करताना दिशाभूल होते.
या त्रिकोणातील लग्ने नेहमीच उपलब्ध असतील, असे नाही, त्यामुळे काही पर्याय स्वीकारावे लागतात, असे करताना संभाव्य चुका टाळाव्यात.

काय करू नये

1. एकमेकांपासून 1 व 8, 3 व 8 अशी लग्ने नसावीत. कारण त्यामुळे षडाष्टकाचा दोष उत्पन्न होतो. उदा. मेष आणि वृश्‍चिक, धनू आणि कर्क, वृषभ आणि तूळ, सिंह आणि मीन. या अपवादात दोन्ही लग्नाचे अधिपती एकच किंवा मित्र असतात. असे लग्न नाईलाज म्हणून मान्य करावे लागते. भागीदारी वरकरणी यशस्वी झाली, तरी दोघांमधे एक प्रकारची बोच असते. अशा व्यक्ती भागीदारी तोडण्याऐवजी, आहे त्यात सुख मानावे म्हणून जीवन कंठतात.
2.एक-आठही नसावे. विशेषतः मिथुन-वृश्‍चिक सर्वस्वी त्याज्य.
3. समोरासमोरील सम सप्तम शुभ समजून काही वेळा काही ज्योतिर्विद मान्य करतात. कदाचित वृषभ-वृश्‍चिक चालू शकेल, या राशींना स्त्री-पुरुष म्हणतात. या दोघांचे किमान शारीरिक आकर्षण टिकत असल्याने दोघे जण आनंदात राहू शकत असतील.
मिथुन-धनू चालेल; परंतु सिंह-कुंभ समोरासमोरच्या राशी असल्या, तरी त्या विरुद्ध तत्त्वाच्या राशी आहेत, त्यामुळे ही दोन मंडळी फार काळ एकत्र राहू शकत नाहीत. वैमनस्य येणारच. कर्क-मकरसुद्धा याच गटात मोडतात. कन्या-मीन चालू शकेल; पण तूळ-मेष जमवून घेतीलच, असे नाही.
4. दोन तत्त्वांच्या व्यक्ती जवळ येताना विचार करावा. विशेषतः वृश्‍चिक-कुंभ, दोघांची एकमेकांवर सतत कुरघोडी चालू असल्याने केव्हा तरी तडा जाणारच.
5. भागीदाराच्या पत्रिका एकमेकांत मिसळल्या असता, एकाचा शनी, दुसऱ्याच्या रवी अथवा मंगळावर नसावा; तसेच हर्षल-नेपच्यून-प्लुटो हे शुक्र-बुधावर किंवा रवी-मंगळावर नसावेत.

या नियमांची पुरेशी माहिती असेल, तर प्रत्येक लग्नराशीचे दुसऱ्या कुठल्या लग्नराशीशी जमते, ते अजमावता येईल.

---
अनिता केळकर
साप्ताहिक सकाळ

0 comments:

टिप्पणी पोस्ट करा

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा