जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जीवन लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
खुपच सुंदर रचना..जीवन शास्त्र सांगीतले आहे या कवितेत...
ज्याने कोणी ही रचली आहे त्यांच खुप खुप अभिनंदन आणि विनम्र वंदन...


ह्याला आयुष्य म्हणावं काय ?

         पद,पैसा,प्रतिष्ठा,प्रसिध्दी
         लोळण घेतात पायात
         बिल गेटची पत्नी तरीही
         का घटस्फोट घेते ह्या वयात ?

शिक्षणाने माणूस समृध्द होतो
आम्ही आहोत अजूनही भ्रमात
उच्चविद्याविभूषकांचे मायबाप
मग का असतात वृध्दाश्रमात ?

         हा डिप्रेशनचा शिकार
         तो आत्महत्या करतो
         ज्याला समजावं सेलिब्रिटी
         तो एकाकीपणात मरतो

ज्यांनी कमावलं नाव
त्याला आनंद का मिळत नाही ?
काय चाटायचं ह्या मोठेपणाला
नातं आपुलकीचं जुळत नाही

         जळजळीत वास्तव सांगतो
         तुमचा विश्वास ह्यावर बसणार नाही
         गरीब, आडाणी , प्रामाणिक मजूरांचे
         मायबाप वृध्दाश्रमात दिसणार नाही

असं नाही त्यांचे घरात
नाहीत वादविवाद
पण घटस्फोट अन् वृध्दाश्रम
बोटावर मोजण्या एवढे अपवाद

         आजारी मायबापांचा ईलाज
         करतात किडूक मिडूक विकून
         पण जिव्हाळ्याची अजूनही त्यांनी
         नाळ ठेवली आहे टिकवून

व्यसनी, रागीट,नवरा
त्याला गरीबीची जोड
तरीही त्याची पत्नी बिच्चारी
करतेच ना तडजोड ?

         दु:ख हलकं करतात
         एकमेकांना भेटून
         एका शिळ्या भाकरीचा तुकडा
         खातात सारेजण वाटून

जेवढी लावतात माया
तेवढंच बोलतात फाडफाड
कितीदा तरी भांडतात
पण कुठे येतो ईगो आड ?

        ऊशाशी दगड घेऊन
        भर ऊन्हातही झोपी जातो
        काळ्या मातीत घाम गाळणारा
        बळीराजा कुठं झोपेची गोळी खातो ?

ना तोल ढळतो ना संयम
दु:खातही सावरण्याची आस
कारण अजूनही ह्या माणसांचा
आहे माणूसकीवर विश्वास

         पण हल्ली इन्स्टंट रिझल्टचे
         आले हे दळभद्री दिवस
         देव सुध्दा लगेच बदलतात
         जर पावला नाही नवस

एकत्रीत कुटूंब हल्ली
सांगा कुणाला हवं ?
कामा शिवाय वाटतं का
आपण कुणाच्या घरी जावं ?

         एकदा तरी बघा जरा
         आपल्या आयुष्याचा रोड मॅप
         कुणाचं कुणाशी पटत नाही
         काय तर म्हणे जनरेशन गॅप

सांगा बरं कुणावर ह्या
विकृत विचारांचा पगडा नाही
घर,बंगला, फ्लॅट असु द्या
दरवाजा कुणाचाही ऊघडा नाही

         बहूत अच्छे, बहूत खुब !
         क्या बात है ? बहूत बढीया !
         एवढ्या ओसंडून वाहतात प्रतिक्रिया
         जागृत चोवीस तास सोशल मिडीया

आभासी दुनियेची चाले
कोरडी कोरडी ख्याली खुशाली
मोबाईलवर साऱ्या शुभेच्छा
मोबाईलवरच श्रध्दांजली

         काय बरोबर ? काय चूक ?
         मत मांडण्याचीही सत्ता नाही
         तो बंद घरात मरून पडला
         वास सुटला तरी शेजाऱ्याला पत्ता नाही

मुलं पाठवले परदेशात
आई संगे म्हातारा बाप कण्हतो
अंत्यविधी उरकून घ्या
पैसे पाठवतो असं पोटचा गोळा म्हणतो

         लेकराला पाॅकेटमनी ,बाईक
         अन् भलेही दिली जरी कार
         किती छान झालं असतं
         जर दिले असते संस्कार ?

होस्टेल ,बोर्डींगात बालपणीच पाठवलं
तो तुम्हाला का वागवणार ?
जमीन असो की जिवन
येथे जे पेरलं तेच ऊगवणार

        जिवशास्र शिकवलं
        जिवनशास्त्र शिकवा
        चुलीत गेली चित्रकला
        सांगा चारित्र्याला टीकवा

त्रिकोण,चौकोन ,षट्कोन
ह्याला सांगा विचारेल कोण ?
ज्याचे जवळ नसेल
आयुष्याचा दृष्टीकोन

         विपरीत परिस्थीतीतही
         जपणूक केली पाहीजे तत्वाची
         व्याकरणापेक्षाही अंत:करणाची
         भाषा असते महत्वाची

चुकू द्या चुकलं तर
अंकगणित अन् बीजगणित
माणसांची बेरीज करा
गुण नाहीत पण गुणवत्ता अगणित

         प्राणपणाने जतन करावे
         नाते शहर, खेडे ,गावाचे
         मेल्यावरती खांदा द्यायला
         असावे चारचौघे जिवाभावाचे

मेल्यावर दोन अश्रू
हीच आयुष्याची कमाई
ज्याने हे कमावलं नसेल
तो आयुष्य जगलाच नाही

         मिळून मिसळून वागावं
         आनंदानं छान जगावं
         तुम्ही सगळी मोठ्ठी माणसं
         म्या पामरानं काय सांगावं ?

श्रावणमासी

श्रावणमासी हर्षमानसी हिरवळ दाटे चोहिकडे
क्षणात येती सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे
वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे
झालासा सूर्यास्त वाटतो, सांज -अहाहा तो उघडे
तरुशिखरांवर उंच घरांवर पिवळे पिवळे ऊन पडे
उठती वरती जलदांवरती अनंत संध्याराग पहा
सर्व नभावर होय रोखिले सुंदरतेचे रुप महा
बलाकमाला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
उतरुनि येती अवनीवरती ग्रहगोलचि की एकमते
फडफड करुनि भिजले अपुले पंख पाखरे सावरती
सुंदर हरिणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती
खिल्लारे ही चरती रानी गोपही गाणी गात फिरे
मंजूळ पावा गाई तयांचा श्रावण महिमा एकसुरे
सुवर्ण चंपक फुलला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजातही बघता भामा रोष मनीचा मावळला
सुंदर परडी घेऊनि हाती पुरोपकंठी शुध्दमती
सुंदर बाला या फुलमाला रम्य फुले पत्री खुडती
देवदर्शना निघती ललना हर्ष मावे ना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत.
श्रावणमासाच्या हार्दिक शुभेच्छा!!

परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..

परवा अचानक शाळेतला, जुना बाक भेटला..
शरीर तुटकं पाय बारीक, थोडा म्हाताराच वाटला...
"ओळखलसं का मला?", विचारलं त्याने हसुन...
वेळ असेल तुला तर बोलुया थोडं बसुन...
गाडी पाहताचं आनंदला, हलवली तुटकी मान...
"खुप मोठा झालासं रे, पैसा कमावलासं छानं"
"ओळखल्यास का बघ ह्या,
माझ्यावरच्या रेघा...
भांडण करुन मिळवलेली,
दोन बोट जागा...
अजुनही भेटतात का रे,
पक्या, मन्या, बंटी...?
टाळ्या देत करत असालं,
मनमोकळ्या गोष्टी...
डबा रोज खाता का रे,
एकमेकांचा चोरुन?
निसरड्या वाटा चालता का,
हाती हात धरुन..?
टचकन् डोळ्यात पाणी आलं,
कंठ आला भरुन...
मित्र सुटले, भेटी सरल्या,
सोबत गेली सरुन...
धावता धावता सुखामागे,
वळुन जेंव्हा पाह्यलं...
एकटाचं पुढे आलो मी,
आयुष्य मागे राह्यलं...
त्राण गेलं, आवेश संपला,
करावं तरी काय..?
कोरड पडली घशाला,
थरथरले तरणे पाय...
तेव्हढ्यात आला शेजारी,
अन् घेतलं मला कुशीत...
बस म्हणाला क्षणभर जवळ,
नक्की येशील खुशीत...
"अरे वेड्या पैश्यापाठी,
फिरतोस वणवण...
कधी तरी थांबुन बघ,
फिरवं मागे मन..."
मित्र सगळे जमवं पुन्हा,
जेव्हा येईल वीट...
वंगण लागतं रे चाकांना,
मग गाडी चालते नीट...
शाळेतल्या त्या सोबत्याचा,
खुप आधार वाटला...
परवा अचानक शाळेतला,
जुना बाक भेटला...

ते दोघं म्हणजे

भांडल्याशिवाय जेवण जात नाही ज्यांना
त्या दोघी म्हणजे ...... सासु आणि सुना

ईच्छा नसतानाही चेहरे एकमेकांसमोर ठेवतार हसरे
ते दोघं म्हणजे ..... जावई आणि सासरे

एकमेकिंच्या पराभवातच मानतात आपला जय
त्या दोघी म्हणजे ..... नणंद आणि भावजय

एकाच घरात राहुनही गॅस मात्र वेगळा हवा
त्या दोघी म्हणजे ..... जावा जावा

बोलणं असतं कमी पण भांडायला असतात अधीर
ते दोघं म्हणजे ..... वहिणी आणि दीर

या सा-या नात्यांमुळे ज्या समस्या निर्माण होतात
त्या समस्या जे सामंजस्याने हाताळतात
ते दोघं म्हणजे ..... यशस्वी पती पत्नी ...

काय मिळत मोठ होवून..?

आईच्या अन्गाई गीताने लागणारी झोप,
आता लागते झोपीच्या गोळ्या खावून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

बाबांनी बोट धरून शिकवलेले चालणे,
आता चालावे लागते काठीचा आधार घेवून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

आईने तेलाचा मारा करून वाढवलीले केस,
आता ते ही लवकरच जातात डोक सोडून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

मित्रान सोबत रात्रन-दिवस असायच्या गप्पा,
आता फ़क्त-"हाय! कसा आहेस..?" ते ही फ़ोने वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

शाळेत सरांच्या रागवण्यातही असायची एक मज्जा,
आता फ़क्त सन्ताप-चिडचिड बॉसच्या बॉसीन्ग वरून..,
काय माहित काय मिळत मोठ होवून..?

सारेच जगतात लहानपणीच्या आठवणिन्च्या जगात,
आनि जगतात-"आय मीस माय टीन-एज" म्हणुन..,
काय माहित काय मिळत मोठ होवून............

बालपण खरच छान असतं

बालपण खरच छान असतं
सारं जग कसं मोकळं रान असतं
त्या चिमुकल्या पंखांना
आभाळ देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
आईचं धरलेलं बोट
जगाचं एक एक टोक असतं
माउलीच्या कुशी मध्ये
आपलं सारं ब्रम्हांड वसतं
बालपण खरच छान असतं ..
आईचा पदर हेच आपलं
आभाळ असतं
आभाळ गवसण्या आभाळ
देखील लहान असतं
बालपण खरच छान असतं ..
चॉकलेटचा बंगला
स्वप्नांचे विषय असतात
रडून गोष्टी मिळतात
असे जीवनाचे आषय असतात
बालपण खरच छान असतं ..
रूसून बसल्यावर पुर्ण होणारे
छोटे छोटे हट्ट असतात
विद्वानाला संभ्रमीत करणारे
छोटे छोटे प्रष्ण असतात
आज सार्‍या बालगोपालांचा वाटे मज हेवा ..
बालपण देगा देवा ... बालपण देगा देवा .

सखी !! मध्यमवर्गीय असणं शाप आहे का ?

काल अचानक एका धनदांडग्याने त्याच्या मित्राला फटकारले
" तुम्ही ! मध्यम वर्गीय लोक कधीच सुधारणार नाहीत
तुमची संकुचित मनोवृत्ती तुम्हाला कधीच
आयुष्यात स्वतःला पुढे येवू देणार नाहीत "

सखी ! मध्यम वर्गीय असणं शाप आहे का ?
मध्यम वर्गीय घरांत जन्म घेणं पाप आहे का ?
परिस्थितीशी लढणारी , थोडक्यांत सुख मानणारी
मध्यम वर्गीय आम्ही खरोखरच समाजाला ताप आहे का ?

जन्मतः हातात सोन्याचा चमचा घेवून येणारे फार थोडे आहेत
बाप जाद्यांच्या कमाईवर, वडिलोपार्जित धंद्यावर बसणारे महाभाग
आयुष्यात आरामात सर्व आईते मिळणारे हे फार मुजोर आहे
मध्यम वर्गीयांना टोमणे मारणे हे ह्यांचे काम आहे

महागाई, तुटपुंजा पगार , अमाप खर्च ह्यात
नेहमी आमच्यासारखा मध्यम वर्गीय होरपळतो
मुलांचे शिक्षण, मुलींचे लग्न, स्वताचे घर घेण्याचे स्वप्नं पाहता(1BHK FLAT)
कर्जाच्या दलदलीत मध्यमवर्गीय नेहमीच फसतो

खरं सांगू ! मध्यमवर्गीयांचे खर्च, स्वप्नं, इच्छा, आकांक्षा, गरजा
ह्या थोडक्यांत समाधान , सुख, शांती ह्यातच असतात
उगाच डोक्याला ताप घेवून tension मध्ये जगणे
ह्यांच्या तत्वाला अजिबात पटत नसतात

महिन्याला घर खर्चापुरता पगार, थोडीशी हौस मौस, स्वताचे घर (1bhk flat )
झाला म्हणजे आयुष्यात आपण सुखी असा समज असतो
कधीतरी महिन्याला हॉटेल मध्ये कुटुंबासमवेत जाऊन
कमीत कमी rate असलेला मेनूचा आस्वाद घेण्याचा बेत असतो

सखी ! एक तर सर्वांत श्रीमंत तरी व्हावे
नाही तर सर्वात गरीब तरी व्हावे
मध्यमवर्गीयांचे जगणं म्हणजे खरंच शापित आहे
" भिक नको पण कुत्रा आवर असेच जगणे आहे "

मध्यमवर्गीयांची दुःखे कुणालाच समजणार नाही
कुणापुढे हाथ पसरायचे ह्यांना कधीच आवडत नाही
काही नसले तरी आम्ही गुपचुपप पाणी पिवून उपाशी झोपू
पण मानाने जगू ! कोणाचे फुकट ऐकून घेणार नाही

जगण्यासाठी अजुन काय हवं?

आई, एक बाप,
एक भाऊ, एक बहिण,
असं एखादं घर हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक मित्र, एक शत्रु,
एक सुख, एक दु़:ख,
असं साधं जीवन
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक प्रेयसी, एक अर्धांगिनी,
एक खरं प्रेम, एक भक्क्म आधार,
यात कुठेही नसला प्रेमाचा अभाव तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक सुर्य, एक चंद्र,
एक दिवस, एक रात्र,
फक्त सगळं समजायला हवं,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक शक्ती, एक भक्ती,
एक सुड, एक आसक्ती
ठायी असेल युक्ती तर,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

थोडा पैसा, थोडी हाव,
थोडा थाट, थोडाबडेजाव,
सगळयांच्या तोडी आपलंच नाव,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक नोकरी, एक छोकरी,
दोन मुलं अन खायला भाकरी,
उत्तम प्रकारची जर असेल चाकरी,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक समुद्र, एक नदी,
एक शांत, एक अवखळ
जीवनात असली जर एक तळमळ
जगण्यासाठी अजुन काय हवं?

एक इच्छा, एक आशा,
एक मागणं, अक अभिलाषा,
मनात भरलेली सदा नशा,
जगण्यासाठी अजुन काय हवं?

सुंदर आयुष्य जगायचं !!

बसल्या बसल्या ठरविल एकदा रोज च का रडायचं !!
आहे त्यात समाधान मानून सुंदर आयुष्य जगायचं !!

१०० वर्षे मिळमिळीत जगण्यापेक्षा ५० वर्षे झळझळीत जगायचं  !!
पण रोजचाच पाढा वाचत आता नाही पुन्हा रडायचं !!

पावशेर पेढे आणि ५ रुपयांच्या फुलांनी का देव तुम्हाला  पावणार आहे ?!!
सारया विश्वाचा मालक तो पेढ्यांच्या मोहात पडून तो का तुमच्यासाठी धावणार आहे ?!!

देवही म्हणेल मनात एकदा करून थोडी सेवा
मागतो किती मेवा म्हणूनच लक्षात ठेवा !!

आत्ता  तुमच तुम्हीच ठरवायचं रोजच  रडायचं !!
कि आहे त्यात समाधान मानून सुंदर आयुष्य जगायचं !!

घरी असताना कधी

घरी असताना कधी घरच्यांचं महत्व कळलंच नाही
आज मात्र क्षणोक्षणी त्यांचीच आठवण येते........
अन डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही

नेहमीच असा वाटायचं कि घरापासून लांब जावं
थोडसं आयुष्य को होईना स्वतः च्या पद्धतीने जगावं

आजही तो दिवस स्मरणात आहे
जेव्हा पहिल्यांदाच शिक्षणासाठी घराबाहेर आलो
आपलं म्हणणारे मित्र भेटले हे नक्कीच
पण आप्तांसाठीच मी परका झालो

नवीन कॉलेज,नवीन मित्र ....,सारकाही नवीन होतं
या मायानगरीत मी हरवणार तर नाहीना असाच नेहमी भासत होतं

दररोज आईबाबांचा फोन यायचा
अन पहिला प्रश्न हाच असायचा " तिकडे सर्व ठीक आहे ना ?"
मीही फक्त "होय" म्हणायचो अन डोळ्यात आलेले अश्रू चटकन सावरून घ्यायचो
पण माहित नाही आईला कसं काय कळायचं
ती मला लगेच विचारून घ्यायची "तुला काही त्रास तर नाहीना"
मी म्हणायचो छे छे "त्रास"........ नाही माझा जरा घसा बसलाय

मी खोटं बोलतोय हे आईलाही कळायचं फोनवर बोलताना हृदय तिचही गहिवरून यायचं
चटकन मग "बाबा" आईकडून फोन घ्यायचे
अन मला धीर देवून......."इकडे सारकाही अगदी व्यवस्थित आहे
तू फक्त अभ्यासाकडे लक्ष दे आणि स्वतः ची काळजी घे "असं सांगायचे

आज मी घरी अधूनमधून जातो पण पाहुणा म्हणून
अन लगेच परत निघून येतो कॉलेज असतं माझं म्हणून
खरच आता नकोसा झालाय हा एकटेपणा अन हे शिक्षण
नेहमीच घरच्यांची आठवण येते नकोसा वाटतो क्षणक्षण

घराबाहेर टाकलेलं हे पाउल म्हणजे यशसंपन्नतेच शिखर
गाठण्यासाठी केलेली वाटचाल कि शिक्षा हेच मला कळत नाही

खरचं.............
घरी असताना घरच्यांचं महत्व कधी कळलंच नाही..........!!

मी अशीच आहे

मी अशीच आहे
एकटी एकटी जगणारी
सर्वात असताना देखील
स्वतःच्या शोधात फिरणारी

मी अशीच आहे
खूप प्रेमाने बोलणारी
आपल्या सरळ वागण्याने
कुणालाही सहज आपलस करणारी

मी अशीच आहे
जीवनाचे मर्म जाणणारी
साध्या मैत्रीच्या नात्यालाही
आपला धर्म मानणारी

मी अशीच आहे
दुःखातही नेहमी हसणारी
अन हसत हसत
नियतिलाही लाजवणारी

मी अशीच आहे
इताराना सतत प्रकाश वाटणारी
पण स्वतः मात्र
काळा॓खात रहाणारी

मी अशीच आहे
सगळयांपासून दूर दूर जाणारी
जाताना मात्र सगळयांच्या मनात
एक घर करून रहाणारी

प्रत्येक मुलीच्या मनात

प्रत्येक मुलीच्या मनात
एक सुंदर स्वप्न असत
चांगला जोडीदार मिळावा
अस मागण असत

विचारून तर बघा तिला
तुझ मन काय म्हणत?
ओठांवरच्या शब्दांनीच सारी
अपेक्षा व्यक्त करत मुलीच मन ते
सैरावैरा धावत असत
कधी खेड तर कधी शहर
गाठत असत
कुणाला सुंदर ,कुणाला शिक्षित

कुणाला गोरी, कुणाला उंच
प्रत्येकाच मुलीविषयीच
वेगळच  मागण असत
तडजोडीची वेळ आली ,
की मुलिलाच पुढे सरकाव लागत
नविन कुटुंबात प्रवेश करतांना
नात्यांच भान ठेवाव लागत

समाज वेगवेगळ्या
प्रथा काढतच असत
ते पूर्ण करता करता
मात्र बापाच्या जिवाच रान होत
२२ वर्ष जपलेल धन हे
शेवटी परकयाला द्याव लागत
जिवापाड जपलेल्या तुकड्याला
स्वत:पासून तोडाव लागत
येणारे लोक येउन जातात

खाणारे पिणारे मजा करून जातात
उरतात ते मुलीचे आई-बाप
जी दुसर्यांची ओझी वाहत असतात
कधी वाटत मुलगी होण पाप का?

आई-बापाला ही सजा का?
या रुढी परंपरा आशा कश्या?
मुलींच्या घरच्यांनीच पाळायच्या कश्या?

फरक कुठे पडतो

लहानपणी मी बाबांचा हात धरून मंदिरात जायचो|
त्यांचा हात धरून देवाला प्रदक्षिणा करायचो|
आताही मी त्यांच्या बरोबर मंदिरात जातो|
मंदिराच्या वाटेवर थकल्यावर त्यांना हात देतो|
आधाराचा हात बदलला म्हणून फरक कुठे पडला आहे|
बापलेकाच्या नात्यातला विश्वास अजुन तोच आहे|

लहानपणी चौपाटीवर आईकडे पाणीपुरीचा हट्ट धरायचो|
नाही म्हणाली तरी सोबत पाणीपुरी खायला लावायचो|
परवा चौपाटीवर आईने मला पाणीपुरी मागितली|
मनसोक्तपणे खा म्हणालो तेव्हा ती गोड हसली|
पाणीपुरी मागणारा बदलला तरी फरक कुठे पडला आहे|
मायलेकाच्या नात्यातला मायेचा ओलावा तोच आहे|

तेव्हा भाउबीजेला बाबंकडून ओवळणीचे पैसे घ्यायचो|
ओवळणी द्यायच्या आधी ताईला खूप चिडवायचो|
कमावता झाल्यापासून तिला काय पाहिजे विचारतो|
मात्र अजूनही ब्लेकबेरीची मागणी नोकियावर भागवतो|
ओवळणी बदलली तरी फरक कुठे पडला आहे|
राखीच्या धाग्यांमधला प्रेमळ बंध तोच आहे|

लहानपणी धाकटयावर दादागिरी  करायचो|
पण कुणी त्याला रागावला की पाठीशी घालायचो|
काल तोच धाकटा जेव्हा परीक्षेला निघाला|
पायाशी झुकून दादा आशीर्वाद दे म्हणाला|
थोरला असो की धाकटा फरक कुठे पडला आहे|
भावाकरता वाटणारी कळकळ तीच आहे|

कॉलेजात भेळपुरीवर वाढदिवस साजरा व्हायचा|
बसथांब्याच्या टपरीवर गप्पांचा तास रंगायचा|
आजही वाढदिवसाला पहाटेच प्रत्येकाचा फोन येतो|
सेलिब्रेष्नच्या निमित्ताने पुन्हा मित्रांचा मेळा भरतो|
शाळा कॉलेज संपुनही फरक कुठे पडला आहे|
मित्रांसाठीचा जिव्हाळा अजूनही तोच आहे|

जवळ असा की दूर , नाती रक्ताची की मनाची फरक कुठे पडतो|
मायेच्या आपल्या माणसांसाठी जीव आपोआप तळमळतो|

जीवनात नाती तशी अनेकच असतात

जीवनात नाती तशी अनेकच असतात,
पण ती जपणारी लोक फार कमीच असतात......
काही नाती असतात रक्ताची,
तर काही हृदयाची......
काही नाती असतात जन्मो-जन्मीची,
तर काही.. ' काही क्षणापुरतीची '.......
काही नाती असतात,
केसांसारखी न तुटणारी,
पण वेळ आलीच तर वाकणारी.....
काही नाती असतात,
लांबुनच आपले म्हनणारी,
जवळ गेल्यावर मात्र दूर करणारी.....
काही नाती असतात,
पैशाने विकत घेता येणारी,
तर काही प्रेमाने आपलेसे करणारी......
काही नाती असतात,
न जोडता सुद्धा टिकणारी,
तर काही जोडून सुद्धा तुटणारी......
जीवनात नाती तशी अनेकच असतात....
म्हणुनच म्हणतात ना.....
" हे जीवन एक रहस्य आहे,
तिथे सर्व काही लपवावं लागतं....
मनात कितीही दुःख असले,
तरी जगा समोर हसावं लागतं....

एका क्षणात सार आयुष्य

एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
आपल्या जवळची व्यक्ती जेव्हा आपल्यापासून दुरावते..
 ती व्यक्ती दुरावल्यावर तिची उणीव वेळो वेळी भासते..
 त्या व्यक्तीची साथ आपल्यला लाभणार नाही याची जाणीव होते..
 तेव्हा हे मन खायला उठते... 

 एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..
 जेव्हा गैरसमजुतीमुळे एक चांगले नाते कायमचे तुटते...
 जेव्हा असे होते तेव्हा दोघांचेही मन दुखावते..
 एका क्षणात हे जग ठेंगणे वाटायला लागते.. 
 एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..

 जेव्हा आपल्या जवळची व्यक्ती आपल्यावर रागावते..
 रागावणे हि तर प्रत्येकाची स्वाभाविक गोष्ट असते..
 पण ह्या रागामुळेच कधी कधी होत्याचे नव्हते "होऊन जाते" 
 एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..

 पण आपल्या जवळच्या व्यक्तीवरच रागवायचे असते..
 कारण जवळच्या व्यक्तीच्या रागावण्यामागे प्रेमच दडलेले असते..
 जसे दिसते तस नसते हे दोघांनाही उमजत असते..
 पण गर्वाचे घर नेहमी खाली असते हे इथे दिसून येते.. 
 एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..

जेव्हा पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे नाते तुटते..
एका पत्त्यामुळे सार होत्याचे करून टाकते..
कारण विश्वास तुटायला एक क्षण हि पुरून उरते..
पण विश्वास परत करून द्यायला आयुष्य कमी पडते.. 
एका क्षणात सार आयुष्य संपल्यासारखे वाटते..

हि वाट खूप दूर जाते..
पण काय सांगू मित्रांनो आयुष्य खूप छोटे असते..
 एखादी व्यक्ती जीव लाऊन दुरावते..
 तेव्हा हे छोटेसे आयुष्य मोठे असल्यासारखे भासते.

कुंपण

कळते मला खरे म्हणजे
शेवटी कोणी कोणाचे नसते
आणि मानले तर कोणी
अगदी तन मन व्यापून  उरते....
विजेच्या तारेवरून
पावसाच्या थेंबांची माळ उतरावी
डोळ्यांच्या कडांवरून
अश्रूंची सर ओघळावी...
इतके साधे सहज
 दु :ख निरपून जाते कधी?
हृदयावरचे चटके असे
सोसून निर्ढावते का मन  .... 
कुंपणासाठी लावलेली मेंदी
हवीहवीशी पण बाहेरच ठेवलेली
तसे "मी" भोवती धरावे
आठवणींनी रिंगण .....
खरच का हवे आहेत
असे तनामनाचे गुंते मला
की  बरेआहे आपले
मेंदीच्या कुंपणासारखे सगळे सीमारेषेवर...
भूतकाळाची   काजळी 
कधीतरी स्वच्छा करायला हवी
सूर्यकिरणांना निदान
 उंबरठ्यावर येऊ द्यावे, नाही का !  
-माधुरी

मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर

मरीन ड्राईव्हच्या कट्ट्यावर
पाय सोडून बसावं..
अर्धं लाटांनी.. अर्धं सरींनी..
चिंब चिंब भिजावं

कट्ट्यावरून चालताना
वा-यावर उडावं..!
शहारून आल्यावर
तू मला बिलगावं

वाफाळलेल्या कॉफीला चार घोटांत प्यावं
चालत चालत नरीमन पॉईंटला जावं

सूर्यास्त होण्याआधीच अंधारून यावं
मग परत चालत चालत यावं...
आता "नॅचरल्स" आईसक्रीम खावं..
आणि पुन्हा पुन्हा हुडहुडावं ..!

पण....
पण असं काहीच होत नाही!
तो बरसत नाही..
हा खवळत नाही..
कॉफी निवळत नाही..
आपण चालत नाही..

तू आलीस की सगळं
फटफटीत होतं
अन् "सीसीडी" मध्ये
आपलं बस्तान होतं

नेहमीसारखा मनातून
मी चरफडतो
इतक्यात गडगडून
'तो' मला हसतो

मी घड्याळ पाहातो..
तुझी वेळ झालेली असते
तू जातेस आणि लगेच
आभाळ भरून येते....

माझीच मी...!!

सर्वस्व माझे तुलाच वाहिले
सोडून गेलास तू
आता एकटीच राहिले
.
ना कोणाची मी
ना कोण माझे आहे
आठवणीत राहणारी
फक्त माझीच मी आहे

स्वप्न नेहमी तुझेच पाहिले
तुटली स्वप्न सारी
आता वास्तव्यच राहिले
.
ना स्वप्नांची मी
ना स्वप्न माझे आहे
आजच्यात जगणारी
फक्त माझीच मी आहे

प्रेमात तुझ्या काव्य रचले
सुटली साथ तुझी
आता शब्दच राहिले
.
आहे शब्दांची मी
अन शब्द माझे आहे
शब्दांमध्ये रमणारी
फक्त माझीच मी आहे

- सुवर्णा मेस्त्री...

मीही प्रेम केले होते त्याच्यावर

मीही प्रेम केले होते त्याच्यावर,
पण त्याला ते ओळखताच आले नाही,
मी तर नेहमी त्याचीच होती,
पण त्यालाच माझे होता आले नाही......

माझ्या मनातील खरे प्रेम,
त्याला कधी पाहताच आले नाही,
डोळ्यांसमोरून दूर केला तरी,
मनातून त्याला काढताच आले नाही......

त्याचा विरहाचा दु:खातून,
अजूनही बाहेर पडता आले नाही......
खूप प्रयत्न करून देखील,
त्याला विसरताच आले नाही.......

तो सोडून गेला तरी,
मला त्याला सोडताच आले नाही,
चार चैघात मला कधीच,
मनमोकळे हसताच आले नाही.......

सात पावलेही आज त्याला,
माझाबरोबर चालता आले नाही.....,
सात जन्माचा जोडीदार ज्याला मानले,
त्याला या एका जन्मांत सुधा माझे होता आले नाही.......

- सुवर्णा

आठवणींचा धागा पकडून

आठवणींचा धागा पकडून ,
उलट दिशेने मी चालले
स्वतःची वाट विसरले
नाहीच हे तुला कळले ...

अंबरी पाहून हसरे तारे,
तुलाच मी चन्द्र समजले
डोळे क्षणभर माझे फसले
नाहीच हे तुला कळले ...

क्षणभर सुख वाटले,
विमनस्कतेने घेरले
वियोगाने होरपळले
नाहीच हे तुला कळले ...

स्वप्नात तरी यावा म्हणून,
पापण्या मिटवून पाहिले
झोप माझी राहिली कुठे ?
नाहीच हे तुला कळले ...

कवि : अस्मिता

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा