आई-बाबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
आई-बाबा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

या आईला तर काही, काही कळत नाही

या आईला तर काही, काही कळत नाही
ओरडत असते सदानकदा.. जरा ब्रेक नाही..
झोपेतून उठवून नेते.. खाण्यासाठी मागे लागते
इतक्या सक्काळी कशी.. भूक लागत नाही
या आईला तर काही.... काही कळत नाही

दूध पितांना कार्टून मला, बघू देत नाही..
बाबा बघतात बातम्या त्यांना, काही म्हणत नाही
सारखी सारखी घड्याळ बघते.. बसू देत नाही
बाथरूममधे ओढत नेते.. रडू देत नाही
या आईला तर काही.... काही कळत नाही

कपडे, भांग, पावडर, शूज.. सारं करून देते
बस येईल म्हणून मला .. बाहेर खेचत नेते
उशीर झाला किती म्हणून.. भरभर येते
फूल तोडून देते तिला.. कौतुक करत नाही
या आईला तर काही.. काही कळत नाही

शाळेमधून आल्यावरही, डबा आधी पाहते
संपवला का नाहीस शोनू... नेहमीच ओरडते
अभ्यास काय दिलाय माझा हेच पाहत बसते
तिचं चित्रं काढलेलं... लक्ष देत नाही
या आईला तर काही.. काही कळत नाही

होमवर्क..खाणं, क्राफ्ट, डायरी शोधून घेते
मला मात्र बीनची गंमत आठवत असते
लक्ष कुठंय विचारते.. धपाटाही देते
तिच्या कसं लक्षात येतं कळतच नाही
या आईला तर काही.. काही कळत नाही

दमून जाऊन झोप येते.. आईला बिलगते
तेव्हां म्हणते शोन्याला या जरा वेळ नाही
पापा घेत राहते हळूच .. अश्रू पुसून घेते
आई अशी रडलेली मला चालत नाही
या आईला तर काही.. काही कळत नाही...

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....

काय,लिहु मी हया आईच्या मायेवर....
त्रास हा आपल्या जन्माचा होतो हा आईवर,
खोट वाटत असेल तर,विचारा तुमच्या आईला,
किती झाला त्रास तुमच्या जन्माचा...........ll१ll

नाही सोडले तिने इतरांसारखे नदीच्या किना-यावर,
घेऊनी कडेवर, खांदयावर,
शिकवल कस चालायच हया,आयुष्याच्या वाटेवर,
बोलली तु जा,आहे मी पाठीशी, या जीवनाच्या वाटेवर............ll२ll

धरुनी हात , शिकवली अ-आ-ई पानावर,
केली मस्ती-आली सुस्ती तर चटके दिले या पाठीवर,
जरी चटके दिले तिने पाठीवर तरी , त्रास होतो तिलाच ,
आहे स्वप्न तिचे, माझ्या मुलाने नाव कोराव जगाच्या पाठीवर............ll३ll

पण,झालो आपण मोठे की फ़ुटतात शिंग-डोक्यावर,
नाही राहत आपल प्रेम आपल्या आई-वडिलांवर,
राहते ते फ़्कत आजुबाजुच्या आणि कालेजच्या मुलींवर,
लाज वाटते कोणी बोलेल तु फ़िरतो अजुन आई-वडिलांबरोबर,
पण,नाही त्रास होत त्या आईला या मुलाच्या वागण्यावर................ll४ll

दिल लग्न लावुन,त्यांनी मला माझ्या निवडीवर,
वाटल,मला ते चुक आणि मी बरोबर या माझ्या निर्णयावर,
संसार करुनी दोघ जाऊ या सुरळीत जीवनावर,
पण,सगळ विसकटल जीवन ही माझ्या गणितावर.................ll५ll

बाळा जातो तर जा,पण जा काळा-वेळेबरोबर,
पण,लक्ष नाही दिले मी तिच्या शब्दावर,
होतो,आता पश्चाताप केलेल्या क्रुत्यावर,
काय,फ़ायदा आता रडुनी तिच्या आठवणीवर,
काय,लिहु मी हया आईच्या मायेवर...........................ll६ll

आई तुझ्या कुशीत

आई तुझ्या कुशीत, पून्हा यावेसे वाटते
निर्दयी या जगापासुन, दुर जावेसे वाटते ॥
 
 कोणी न येथे कुणाचा, सारीच नाती खोटी
 तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते ॥
 
 कोळून प्यायलो मी, सुख दुःख सारे
 माते तुझ्या विरहास, न प्यावेसे वाटते ॥
 
 कित्येक रात्री, ऐश्वर्यात लोळलो मी
 अखेरच्या क्षणाला, तुझ्या कुशीत निजावेसे वाटते ॥

 दगडातला तो देवही,आता नवसाविना पावेना
 निस्वार्थ हृदय माऊली, तुलाच पूजावेसे वाटते ॥
 
 असेन जर मजला, मानव जन्म कधी
 आई तुझ्याच पोटी, पून्हा जन्मावेसे वाटते ॥

आई बाबा

पुनमेच्या चंद्रावानी
आईची शीतल माया
जीवनाच्या मध्यान्ही या
केवळ आईच धरते छाया

आई म्हंजे असते ज्योत
उजळते घर प्रकाशाने
चंदनाचे झाड – सौरभ
दरवळते जसे कणाकणाने

बाप असतो तेलवात
जळत असतो क्षणाक्षाला
हाडांची कडे करून
आधार देतो मनामनाला

आई म्हणजे सागर जसा
प्रेम, औदार्य , करुणेचा
अथांग...मन जिचे
जसा प्रशांत ममतेचा

आकाशाहून सदैव उन्नत
उंची माझ्या बाबांची
विश्वाहूनही विशाल हृदय
स्थितप्रज्ञता हिमालयाची

आई हा शब्दच असा
सरोवरात कमळ विलसती
सप्तसुरांचे माधुर्यवैभव
या एका आईत वसती

आई...

मी घरी कीतीही दिवसभर दंगा केला
तरी मला आई थोपताल्याशिवय कधीच झोपली नाही
घरापासून दूर म्हणुनच आता कदाचित
शांत झोप कधी लागलीच नाही.

कुणी वीचारते "तुला घरी जाऊस वाटत नाही"?
कसा सांगू त्यांना घरातून निघताना
आईला मारलेली मीठी सोडवत नाही.

आई तू सांगायची गरज नाही
तुला माझी आठवण येते
आता माझ्यासाठी डब्बा करायचा नसतो
तरीही तू सहा वाजताच उठतेस.

तुझ्या हातचा चहा तुझ्या हातची पोली
तुझ्या हातची माझी न आवडती भाजी खायला
आजही जीभ आसुसली.

घरापासून दूर .......
आई जग खुप वेगले आहे
तुझ्या सावलीत अगदी बिनधास्त होतो
आता रानागानत उन आहे

तू आपल्या पील्लान साठी
सगला केलस एक दीवस पिल्लं म्हणाली
आई आता आम्हाला जायचय
आंनी तू त्यांना जाऊ दीलस
आई तू इथे नाहीस
बाकी माझ्याकडे सगळे आहे
घरापासून दूर
जग खुप वेगले आहे.

पहिला स्पर्श तुझा,

पहिला स्पर्श तुझा,
त्याला पुलकित करतो
मग केवळ तुझ्याच ,
भविष्यासाठी जो जगतो
तो बाप असतो ...!!!

शब्दांत व्यक्त होण
जमत नाही ज्याला
तू आजारी असताना
वेदना होते पण काळजाला
कारण तुझीच चिंता असते रे बापाला ...!!!

नापास झाल्यावर दिलाही
असेल जरी पाठीत धपाटा
सांग पण त्याने कधी
झाला का रे तुझा तोटा ..???
म्हणूनच बापाला समजू नकोस 'छोटा' ...!!!

पहिला आलास शर्यतीत तेव्हा
'माझा छावा 'म्हटला असेल खुशीने
त्यानेच नाही तुला, सायकल
शिकवली मोठ्या हौशीने
तू होताना 'पुरुष' धीर दिलाच असेल 'ना'त्याने ...!!!

चोरून ठेवले असेल
पापाणितल्या 'पाण्याला'
नि पाठीवर हात,
तुझ्या पहिल्या पगाराला
सार्थ जन्माचे तेव्हा वाटले असेल त्याला ...!!!

वर काटे असले तरी गरयासारखे
गोड हृदय असते रे बापाला
गरज असते 'आधाराची '
कधी कधी त्याही 'आधाराला'
म्हणूनच न झिडकारता
शोध बापातल्या 'बाबाला' ...!!!

बाबा खर सांग...

बाबा खर सांग तू माझ्या आवडीसाठी..
तुझ्या किती आवडी सोडल्या ..
माझ्या सुखासाठी तुझ्या न सुटना-या सवई मोडल्या ?
माझ्या एका सहलीच्या पैश्यासाठी..
रिक्शा सोडून बस ने गेलास कामाला ..
घेत होता नवे कपडे मला
अन स्वत : तीच पैंट फाटेपर्यंत घालायचा .
खर सांगशील तुझा जमाखर्च कसा रे भागवायचा ?
जमवलिस कवडी कवडी ..
दिलीस मला भेल अन रेवडी...
बाबा मी मोठा होत गेलो
अन तू म्हातारा
मला येत गेली अक्कल
अन तुला पडल टक्कल
विसरलास कधी माझ्या साठी होत होता घोड़ा
आता मलाच सांगत असतो झालास न घोडा .
हे तुझ माझ अस वेगळ होत नात
खर सांगशील माझ्या सुखासाठी
आईलाही तू कधी दिला नाही गजरा
पण माझ्या पु-या केल्या गरजा
बाबा आता मी झालोय मोठा
तुझ्या सुखाला नाही राहणार तोटा
तुझ्यासाठी आता इथून पुढे झिजेल
तुझ अपुर स्वप्न पूर्ण होताना दिसेल
तू फ़क्त एक काम कर
आता कामावर जायच तेव्हढ बंद कर
घरी बसून आता आराम कर '
खुप दिवस आईशी निवांत बोलला नसेल
तिला घेउन लाम्ब जायचा एखादा प्लान कर
बाबा आता मी मोठा झालो

आई.....

पहिला शब्द जो मी उच्चारला,
पहिला घास जीने मला भरवला,
हाताचे बोट पकडून जीने मला चालवले,
आजारी असताना जीने रात्रंदिवस काढले.

आठवतय मला,
चूकल्यावर धपाटा घातलेला,
भूक लागली आहे सांगताच,
खाऊचा डब्बा पुढे केलेला.

अनेकदा तिने,
जेवणासाठि थांबायचे,
आणि मी मात्र न सांगताच,
बाहेरून खाऊन यायचे.

कधी कधी रागाच्या भरात,
उलटहि बोललोय,
आणि मग चूक समजल्यावर,
ढसा ढसा रडलोय.

तिने सुद्धा माझे बोलणे,
कधीच मनावर नाहि घेतले,
मागाहून घालवलेले माझे अश्रू,
पदराने पुसून टाकले.

माझी स्तुती करताना,
ती कधीच थांबत नाहि,
अन माझा मोठेपणा सांगतान ,
तिच्या आनंदाला पारावर ऊरत नाहि.

माझा विचार करणे,
तिने कधिच सोडले नाहि,
माझ्यावर प्रेम करण्याला,
कधीच अंत नाही.

मी सुद्धा ठरवले आहे,
तिला नेहमी खुश ठेवायचे,
कितीहि काहि झाले तरी,
तिला नाहि दुखवायचे.

आईची महानता सांगायला,
शब्द कधीच पूरणार नाहि,
तिचे उपकार फ़ेडायला,
सात जन्म सुद्धा शक्य नाहि.

देवाकडे एकच मागणे,
भरपूर आयुश्य लाभो तिला,
माझ्या प्रत्येक जन्मी,
तिचाच गर्भ दे मजला.

बाप

शाळेपासून बापाच्या तो धाकात रहात असतो
कमी मार्क पडलेलं प्रगतीपुस्तक लपवत असतो
आईच्या पाठी लपून तो, बापाशी बोलत असतो
डोळे चुकवून बापाचा हुंदडायला जात असतो

शाळा संपते, पाटी फुटते, नव जग समोर येतं
कॉलेज नांवाच्या भुलभुलैयात मन हरखून जात असतं
हाती आलेले मार्क घेऊन पायऱ्या झिजत फिरत असतं
बाप पहातो स्वप्न नवी, हे मुखडा शोधत असतं

सुरु होतं कॉलेज नवं, दिवस भुर्रकन उडून जातात
एटीकेटी च्या चक्रातून वर्ष पुढे सरत जातात
ग्रुप जमतो, दोस्ती होते, मारामाऱ्या दणाणतात
माझा बाप ठाउक नाही म्हणत धमक्या गाजत असतात

परीक्षा संपते, अभ्यास सरतो डिग्री पडते हाती याच्या
नोकरी मिळवतो, ती टिकवत कमावू लागतो चार दिडक्या
आरामात पसरणारे बाजीराव मग घोड्यावर स्वार होतात
नोकरीच्या बाजारात मग नेमाने मोहिमा काढू लागतात

नोकरी बदलते, छोकरी सापडते बार मग उडतो जोरात
एकट्याचे दोघे होतात, सुखी संसार करु लागतात
दोघांच्या अंगणात मग बछडं तिसरं खेळू लागतं
नव्या कोऱ्या बापाला मग मात्र जुन्याचं मन कळू लागतं

नवा कोरा बाप मग पोरा सवे खेळू लागतो
जुना बाप आता आजोबाच्या कायेत शिरतो
पोराशी खेळता खेळता दोघेही जातात भूतकाळांत
एकाला दिसतो दुसरा लहान दुसरा पहातो गोष्ट महान

रंगलेल्या गोष्टीत या मग शिरतो फ्लॅशबॅक
बापाच्या भूमिकेतून पोर पहातो भूतकाळ
लेकरासाठी कळवळणारा मग बाप दिसतो
त्याची लाल रेघ ऊरात घेऊन जो फिरत असतो

कडकपणाच्या आवरणाखाली झुळझुळणारं पाणी असतं
भल्यासाठी लेकरांच्या झगडणारं हाड असतं
दोन घास कमी खाईल पण पोराना गोड देतो
हट्टासाठी पोरांच्या तो ओव्हरटाईम करत असतो

डोक्यावरती उन झेलीत सांवली तो देत असतो
दणदणत्या पावसातून कुटुंब आपले जपत असतो
घर नीट चालण्यासाठी स्वतः बाहेर फिरत असतो
आईच्या मऊशार तळव्या मागचा तोच राकट आधार असतो

बाप कधी रडत नाही, बाप कधी खचत नाही
बाप कधी उतत नाही, बाप कधी मातत नाही
पोरं सोडतात घरटं अन् शोधतात क्षितिजे नवी
बाप मात्र धरुन बसतो घरट्याची प्रत्येक काडी

पोरांच्या यशा सोबत त्याच मन हसत असतं
अपयश पचवताना आतून ते रडत असतं
कांही झालं कितीही झालं तरी कणा ताठ असतो
खचलेल्या पोराला तोच उभारी देत असतो

सारी कथा समजायला फार मोठं व्हाव लागतं
बापाचं मन कठीण फार, चटकन हाती लागत नसतं
आकाशाहून भव्य व सागराहून खोली असते
बाप या शब्दाची महतीच मोठी न्यारी असते

कळत नाही बापाचं मन स्वतः बाप झाल्याशिवाय
बाप माणूस असतो कसा कळणार नाही झाल्याशिवाय
असतं न्यारंच रसायन त्याची फोड उकलत नाही
म्हणून तर बापावर कविता कोणी करत नाही

करणार कशी कविता कोण तो त्यात मावत नाही
चार ओळीत सांगण्यासारखा बाप कांही छोटा नाही
सोन चाफ्याचे फुल ते सुगंध कुपित मावणार नाही
बाप नांवाच्या देवाचा थांग कांही लागणार नाही

केला खरा आज गुन्हा त्याला छोडा शोधण्याचा
जमेल तेवढा सांगीतला आधार आमच्या असण्याचा
एक मात्र अगदी खरं त्याच्या शिवाय जमत नाही
आई मार्फत बोललं तरी बोलल्याशिवाय रहावत नाही

सांगतो आता शेवटचं, कान करा ईकडे जरा
पृथ्वि तोलून धरण्यासाठी शेषाचाच लागतो फणा
बाप नांवाच्या वृक्षाचं असंच कांहीस जिणं असतं
ते समजून घेण्या साठी बाप होणं भाग असतं

आईलाही 'मन' असतं

आईलाही 'मन' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा 'स्वप्न' असतं,अम्हाला ते कळालंच नाही

'आई' राबते दिन्-रात्र, आम्हाला घडवण्यासाठी
आम्ही असतो विचार मग्न, आमुच्याच स्वार्थासाठी
आईच 'श्रेष्ठ गुरु' असते, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच आमुचा आधार असते, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' झोपते उपाशी पोटी, आमचं पोट भरण्यासाठी
आम्ही सदा पैशे उडवतो, अमुच्याच हवसेपोटी
आईच्या सूध्धा 'आवडी' असतातं,अम्हाला कधी समजलंच नाही
तिलां सूध्धां 'हसायचं' असतं, अम्हाला ते कळालंच नाही

'आई' नेसते फाटकं लुगडं, आम्हाला सजवन्यासाठी
आम्ही सादा रागावतो तिच्यावर,आमुच्याच चूकीसाठी
आईलाही 'जगायंचं' असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तीच खर 'धन' असतं,अम्हाला ते कळालंच नाही.

आईलाही मन असतं, अम्हाला कधी समजलंच नाही
तिचं सूध्धा स्वप्न असतं,अम्हाला ते कळालंच नाही

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं,
खेळायचयं हसायचयं आणि त्याना बीलगायचयं.
मनं कितीही उदास असले तरी मला हसयचयं,
जरी भरलं पोट तरीही पुन्हा ते भरायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

ऊन आले की वाटते बाबा मला सावली करतील,
ठेच लागली की वाटते बाबा माझा हात धरतील.
गर्दीमध्ये बाजारात पुन्हा फिरायचयं,
आज मात्र बाबाचा हात धरायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मी वाट पाहतोय त्या दिवसाची,
मागणी घालतोय देवा मी नवसाची.
डोळे भरुन त्याना पुन्हा पहायचयं,
मांडीवर डोके ठेऊन मनं भरुन रडायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

तो एक दिवस देशील का देवा?
देईन तुला हवे ते मागशील तेव्हा,
त्याच्या तोंडून मला माझ नाव ऐकाचयं,
आणि त्या हाकेला मला एकदा हो म्हनायचयं,

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

या लेकराची हाक ऐक ना बाबा,
आई आणि बारकू साठी तरी ये ना बाबा.
मला पुन्हा एकदा अ ब क ड शिकायचयं,
तुम्ही रागवाल म्हणून मला पूर्ण आभ्यास करायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मी आता तुम्हाला खाऊ नाही मागनार,
नाही रडनार आणि दुध सांडनार.
आई समोर एकदा मला तुम्हाला आणायचयं,
बारकु आणि मला तुमच्या समेत खेळायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

जाताना मला सांगुन का नाही गेलात?
वाट पाहिली किती मी तुम्ही परत नाही आलात.
आज तुम्हाला हे परत विचारयचयं,
आतुर आहे मी उत्तर तुम्ही द्यायचयं,

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

मला आहे विश्वास तुम्ही नाही येनार,
मग सांगा बाबा आम्हाकडे कोन बघनार?
ठरवले आहे तुम्ही आम्हाला फक्त वरुन बघायचयं,
कसे जगतो तुमच्या शिवाय हे देवाला सांगायचयं.

मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं....

निघतो आता मी आई वाट पाहत आहे,
तुमच्यासाठी आणलेला हार मी वाहत आहे.
पण मला पुन्हा एकदा विचारायचयं,
आपली भेट कधी होईल हे ठरवायचयं.
मला एक दिवस माझ्या बाबांना भेटायचयं...

आई तुझी खूप आठवण येते

तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

आरक्त चेह~याने सांज ढळते
अन् पाखरांची किलबिल होते
घराकडे मी परतत असताना
आई तुझी खूप आठवण येते

तेच कुठेतरी सॅक फेकून देणे
तेच घाईघाईत कपडे बदलणे
अस्ताव्यस्त कपडे उचलताना
मात्र आई तुझी आठवण येते

एका हाताने बेसिनमध्ये भांडी धुनं
दुस~या हाताने कडवट चहा पिणं
तव्यातील चपाती जेव्हा करपून जाते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

पंख फुटल्यावर प्रत्येक पाखराला
आकाशी झेप तर घ्यावीच लागते
दमून जातो जेव्हा जीव पिल्लाचा
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

आजही इथे साता समुद्रापार आई
कधीतरी डोळे भरून येतात अन्
पापण्यात तुझी मूर्ती उभी राहते
तेव्हा आई तुझी खूप आठवण येते

आई या शब्दात

आई! आई या शब्दात सगळविश्व सामावालेल असत
तिच्या मायेच्या कुशीत पिलाने सार कही कमावालेल असत
आईच्या वत्सल्यादायी डोळ्यात उज्जवल भविष्याच स्वप्न पहायच असत
तिच्याच आशिर्वादाने स्वप्नाना वास्तवात आणायच असत
आईच्या हृदय मंदिरात कायम पुजारी बनुन रहायच असत
तिच्या मूर्तिमंत चेहरयात परमेश्वर दर्शन करायच असत

काहीना नसते आई....
काहीना नसते आई पण .....,
वाईट वाटुन घ्यायच नसत
ही तर दैवाने दिलेली संधी आहे
कारण आईला फक्त अनुभवायच असत .

आई

शांत शांत मनावर
दाटता वादळ
हेलकावते मन
उठतो कल्लोळ.

नभी चांदव्याची रात
लावीते हुरहुर
ओघळे आठवांच्या सरी
माजते काहुर .

क्षितीजावर दिसे मग
तिचाच चेहरा
दाखवित दिशा
हासे नकळत जरा

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे

गे मायभू तुझे मी फेडीन पांग सारे;
आणीन आरतीला हे सूर्य, चंद्र, तारे.

आई, तुझ्यापुढे मी आहे अजून तान्हा;
शब्दात सोड माझ्या आता हळूच पान्हा.

आई, तुझ्यापुढे ही माझी व्यथा कशाला ?
जेव्हा तुझ्यामुळे ह्या जन्मास अर्थ आला !

मी पायधूळ घेतो जेव्हा तुझी जराशी,
माझी ललाटरेषा बनते प्रयागकाशी !

आई, तुझी अशी मी गाईन रोज गाणी
माझी तुझ्या दुधाने गेली भिजून वाणी !

गीत - सुरेश भट
हे गीत मला आकाश सरांनी
स्क्रैप केल्यामुले
मी त्यांचा आभारी आहे.

मातृवंदना

दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस
किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
जिण्यालागि आकार माझ्या दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

गुरु आद्य तू,माझिया जीवनात
तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
वठे भूमिका पाठ जैसा दिलास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

तुझे थोर संस्कार आचार झाले
तुझे यत्नप्रामाण्य सिध्दीस गेले,
तुझ्या चिंतने,लोभ पावे निरास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

उमेचे,रमेचे,तसे शारदेचे
जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
तुझ्या वंदितो माउली,पाउलांस

महाकवी ग.दि.माडगूळकर
(पूरिया संग्रहातून साभार)

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी
’आई !’ म्हणोनी कोणी । आईस हाक मारी
ती हाक येइ कानी । मज होय शोककारी
नोहेच हाक माते । मारी कुणी कुठारी
आई कुणा म्हणू मी ? । आई घरी न दारी !
ही न्यूनता सुखाची । चित्ता सदा विदारी
स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

चारा मुखी पिलांच्या । चिमणी हळूच देई
गोठ्यात वासरांना । या चाटतात गाई
वात्सल्य हे पशूंचे । मी रोज रोज पाही
पाहून अंतरात्मा । व्याकूळ मात्र होई !
वात्सल्य माउलीचे । आम्हा जगात नाही
दुर्भाग्य याविना का ? । आम्हास नाही आई


शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

ताईस या कशाची । जाणीव काही नाही
त्या सान बालिकेला । समजे न यात काही
पाणी तरारताना । नेत्रात बावरे ही
ऐकूनि घे परंतू । ’आम्हास नाहि आई’
सांगे तसे मुलीना । ’आम्हास नाहि आई’
ते बोल येति कानी । ’आम्हास नाहि आई’

आई ! तुझ्याच ठायी । सामर्थ्य नंदिनीचे
माहेर मंगलाचे । अद्वैत तापसांचे
गांभीर्य सागराचे । औदार्य या धरेचे
नेत्रात तेज नाचे । त्या शांत चंद्रिकेचे
वात्सल्य गाढ पोटी । त्या मेघमंडळाचे
वात्सल्य या गुणांचे । आई तुझ्यात साचे

गुंफूनि पूर्वजांच्या । मी गाइले गुणाला
साऱ्या सभाजनांनी । या वानिले कृतीला
आई ! करावया तू । नाहीस कौतुकाला
या न्यूनतेमुळे ही । मज त्याज्य पुष्पमाला
पंचारती जनांची । ना तोषवी मनाला
परि जीव बालकाचा । तव कौतुका भुकेला

येशील तू घराला । परतून केधवा गे !
दवडू नको घडीला । ये ये निघून वेगे
हे गुंतले जिवाचे । पायी तुझ्याच धागे
कर्तव्य माउलीचे । करण्यास येइ वेगे
रुसणार मी न आता । जरि बोलशील रागे
ये रागवावयाही । परि येइ येइ वेगे

आई मला लवकर

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय

नसतो कुठला होमवर्क न असतो कुठला त्रास
ऑफिस मधुन आल्यावर नसतो कुठला क्लास
घरी येउन आरामात टी.व्ही. पहात रहायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

सगळे असतात फ़्रेंड आणि टिचर कुणीच नसतात
चॉकलेट देणार्‍या काकानां बाबा बॉस म्हणतात
छान छान बॉस कडुन रोज चॉकलेट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

कॉमप्यूटरवर बसुन कसल काम करतात?
कॉमप्यूटरवर तर नुसतेच गेम असतात
रोज रोज गेम खेळुन टॉप स्कोरर व्हायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसमध्ये जाउन भरपूर मज्जा करतात
तरीच बरं नसल तरी ऑफिसला जातात
ऑफिसला जाउन मला पण खेळायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

ऑफिसच्या रिसेस मध्ये हॉटेल मध्ये जातात
हॉटेल मध्ये जाउन मस्त चमचमीत खातात
बरगर, पिज्झा, फ़्राईस आणि आईसफ्रूट खायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

महिन्याच्या शेवटी ह्यांना केवढे पैसे मिळतात!
देव जाणो येवढ्या पैशांच हे काय करतात?
मला तर महिन्याला फक्त एकच खेळण घ्यायचय
मस्त पैकी बॅग घेउन ऑफिसला जायचय...

आई मला लवकर लवकर मोठ्ठ मोठ्ठ व्हायचय...

आईचं गुणगाण खुप केले

आईचं गुणगाण खुप केले
पण बिचा-या बापाने काय केले?
बिकट प्रसंगी बापच सदा सोडवी
आपण फक्त गातो आईचीच गोडवी
आईकडे असतील अश्रुंचे पाट,
तर बाप म्हणजे संयमाचा घाट.
आठवते जेवण करणारी प्रेमळ आई
त्या शिदोरीची सोय ही बापच पाही....

देवकी - यशोदेचं प्रेम मनात साठवा
टोपलीतुन बाळास नेणारा वासुदेवही आठवा
रामा साठी कौशल्येची झाली असेल कसरत
पुत्र वियोगाने मरण पावला दशरथ

काटकसर करुन मुलास देतो पौकेटमनी
आपण मात्र वापरे शर्ट-पॅन्ट जुनी
मुलीला हवे ब्युटीपर्लर, नवी साडी
घरी बाप आटपतो बिन साबणाची दाढी

वयात आल्यावर मुले आपल्याच विश्वात मग्न
बापाला दिसते मुलांचे शिक्षण, पोरीचे लग्न
मुलाच्या नोकरीसाठी जिना चढुन लागते धाप
आठवा मुलीच्या स्थळासाठी उंबरठे झिजवणारा बाप

जीवनभर मुलांच्या पाठी बापाच्या सदिच्छा
त्यांनी समजुन घ्यावं, हीच माफक इच्छा..!!

दिसती माझी माय

हंबरून वासराले
चाटती जवा गाय
तवा मले तिच्यामंदी
दिसती माझी माय

आयाबाया सांगत व्हत्या
व्हतो जवा तान्हा
दुस्काळात मायेच्या माजे
आटला व्हता पान्हा
पिठामंदी पानी टाकून
पाजत जाय
तवा मले पिठामंदी
दिसती माझी माय

कन्या-काट्या येचायाला
माय जाई रानी
पायात नसे वहान तिच्या
फिरे अनवानी
काट्याकुट्यालाही तिचं
नसे पाय
तवा मले काट्यामंदी
दिसती माझी माय

बाप माझा रोज लावी
मायच्या मागं टुमनं
बास झालं शिक्षान आता
घेऊ दे हाती काम
शिकुनश्‍यानं कुठं मोठ्ठा
मास्तर हुनार हायं
तवा मले मास्तरमंदी
दिसतो माझी माय

दारु पिऊन मायेले मारी
जवा माझा बाप
थरथर कापे आन
लागे तिले धाप
कसायाच्या दावनीला
बांधली जशी गाय
तवा मले गायीमंदी
दिसती माझी माय

बोलता बोलता येकदा
तिच्या डोळा आलं पानी
सांग म्हने राजा तुझी
कवा दिसंल रानी
भरल्या डोल्यान कवा पाहील
दुधावरची साय
तवा मले सायीमंदी
दिसती माझी माय

म्हनून म्हंतो आनंदानं
भरावी तुझी वटी
पुना येकदा जलम घ्यावा
तुजे पोटी
तुझ्या चरनी ठेवून माया
धरावं तुझं पाय
तवा मले पायामंदी
दिसती माझी माय

(कवी:- स. द. पाचपोळ, हिंगोली)

प्रतिक्रया लिहा मराठीतून ...

हे विजेट आपल्या ब्लॉगवर जोडा